५० हजारांच्या अनुदानापासून सांगली जिल्ह्यातील ६० हजारांवर शेतकरी राहणार वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 03:46 PM2022-06-27T15:46:03+5:302022-06-27T15:46:33+5:30
जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी शासनाच्या एका चुकीमुळे अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
अविनाश कोळी
सांगली : महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत नियमित कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. योजनेतील परतफेडीच्या तारखेच्या गोंधळाने जिल्ह्यातील ६० हजारांहून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकेच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या जिल्ह्यातील सव्वालाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान मिळणार असून, सुमारे ६०० कोटीहून अधिक अनुदान मिळण्याचा प्राथमिक अंदाज आहे. तरीही जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी शासनाच्या एका चुकीमुळे अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
शासनाने कर्ज परतफेडीच्या दिलेल्या देय तारखा व धोरणानुसार बँकांनी दिलेल्या देय तारखांमध्ये मोठी तफावत आहे. २०१७ - १८ या वर्षात घेतलेले अल्प मुदत पीककर्ज ३० जून २०१८पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास, २०१८ - १९ या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज ३० जून २०१९ पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास तसेच २०१९ - २० या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज ३१ ऑगस्ट २०२०पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येणार आहे.
मात्र, कर्जवाटप धोरणाप्रमाणे १ जुलै २०१७ ते ३१ मार्च २०१८ पर्यंत उचल केलेल्या ऊस कर्जाची देय तारीख ३० जून २०१९, तर द्राक्षांसाठी १ जानेवारी २०१८ ते ३१ मार्च २०१८ या काळातील कर्जाची देय तारीख २६ एप्रिल २०१९ आहे. उसाकरिता १ जुलै २०१८ ते ३१ मार्च २०१९पर्यंत वाटप केलेल्या कर्जाची देय तारीख ३१ ऑगस्ट २०२० आहे. द्राक्ष पिकांच्या कर्जासाठीही हीच तारीख देय असते, अशा तिन्हीही आर्थिक वर्षातील प्रत्यक्षातील देय तारखा व शासनाने निश्चित केलेल्या तारखा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करुनही ५० टक्क्यांहून अधिक शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची भीती आहे.
जिल्ह्यातील नियमित कर्जदार शेतकरी
वर्ष शेतकरी (लाखात) कर्ज परतफेड (कोटीत)
२०१७-१८ १.३० ५४८.२६
२०१८-१९ १.१९ ७७२.३१
२०१९-२० १ ६६८.०७