विवेकवादातून मानव जातीची सर्वांगीण समृद्धी शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:18 AM2021-07-08T04:18:42+5:302021-07-08T04:18:42+5:30
इस्लामपूर : विवेकवाद माणसाचे हित, प्रतिष्ठा केंद्रस्थानी मानते, विवेकवाद हे मानवाच्या सुखी जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. यातून मानवजातीची सर्वांगीण समृद्धी ...
इस्लामपूर : विवेकवाद माणसाचे हित, प्रतिष्ठा केंद्रस्थानी मानते, विवेकवाद हे मानवाच्या सुखी जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. यातून मानवजातीची सर्वांगीण समृद्धी होते. विवेकशीलता हे मानवाचे खास वैशिष्ट्य आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत श्री विजयसिंह यादव महाविद्यालय पेठ वडगावमधील विवेक वाहिनीने आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात ‘विवेकवाद समजून घेताना’ या विषयावर ते बोलत होते. प्राचार्य डॉ. विजया चव्हाण अध्यक्षस्थानी होत्या.
बनसोडे म्हणाले, विवेकवाद हा मानवी जीवनाबद्दलचा मूल्याधिष्ठित दृष्टिकोन आहे. विवेकवादी जीवनशैली माणसाला अधिक समृद्ध करते. गेली बत्तीस वर्षे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विवेकवादाचा प्रचार व प्रसार करत आहे.
प्राचार्या डॉ. चव्हाण म्हणाल्या, तरुण वयातच विद्यार्थ्यांच्यामध्ये विवेकी मूल्य विचार रुजला पाहिजे. विवेकवादाची मोठी परंपरा आपल्या देशात आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. विवेक वाहिनीतून अनेक तरुण-तरुणी विवेकशील बनून स्वत:ला घडवतील आणि समाजाला पुढे घेऊन जातील.
प्रा. डॉ. प्रभाकर निसर्गंध यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. नाजीम शेख यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. अशोक चव्हाण यांनी आभार मानले. प्रा. प्रभुदास खाबडे यांनी सूत्रसंचालन केले.