ऑक्सिमीटर, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर शब्द झाले परवलीचे;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:25 AM2020-12-29T04:25:44+5:302020-12-29T04:25:44+5:30

शरद जाधव / लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : या वर्षाची सुरुवात होतानाच कोरोनाची कुणकुण लागली आणि संपूर्ण वर्ष त्याच्या ...

Oximeter, sanitizer, thermal scanner became the password; | ऑक्सिमीटर, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर शब्द झाले परवलीचे;

ऑक्सिमीटर, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर शब्द झाले परवलीचे;

Next

शरद जाधव /

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : या वर्षाची सुरुवात होतानाच कोरोनाची कुणकुण लागली आणि संपूर्ण वर्ष त्याच्या निवारणातच गेले. गेल्या दहा महिन्यात अनेक बदल घडताना, अगदी वाडी-वस्तीवरील आजी-आजोबांच्या तोंडीही क्वारंटाईन, पॉझिटिव्ह असे शब्द आले. तसेच केवळ वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असलेली ऑक्सिमीटर, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर आदी उपकरणे प्रत्येक घरातील भाग बनली. आरोग्यविषयक जागृती वाढतानाच हाताची स्वच्छता, मास्कचा वापर यामुळे वैयक्तिक स्वच्छतेकडे कल वाढला असला तरी, हे वर्ष प्रत्येकालाच नवीन अनुभव देऊन गेले.

कोरोनाचा कहर अनुभवलेल्या जिल्ह्यात सध्या दिलासादायक चित्र आहे. तरीही काेरोनामुळे सर्वांनाच स्वत:चे आरोग्य किती महत्त्वाचे आहे, याचा अनुभव आला. मार्च महिन्यात पहिला रूग्ण आढळल्यानंतर जुलैपर्यंत बाधितांची संख्या मर्यादित होती. मात्र, त्यानंतर वेगाने संख्या वाढून, एक वेळ अशी आली की, जिल्हा कोरोनाचा ‘हॉट स्पॉट’ ठरला होता. मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक हाेते. या परिस्थितीवर मात करत आता कोरोनाच्या कटू आठवणींना विसरत प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे.

गेल्यावर्षीपर्यंत ऑक्सिजनची पातळी किती असावी, शरीरातील तापमान किती असावे आणि एचआरसीटी स्कोर किती, याबाबत प्रत्येकजण अनभिज्ञ होता. आता मात्र, लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत ऑक्सिमीटरचा वापर करत आहेत. तापमान मोजण्यासाठी थर्मल स्कॅनर वापरला जात आहे, तर फक्त डॉक्टरांच्या इंजेक्शनपूर्वीच वापरले जाणारे सॅनिटायझर प्रत्येकाच्या घराच्या प्रवेशव्दारावर हात स्वच्छ करण्यासाठी सज्ज असते.

बाहेरून घरात आल्यानंतर हात-पाय धुणे अगोदर अनेकजण टाळत होते. कोरोनामुळे मात्र, वैयक्तिक स्वच्छतेचे प्रमाण खूप वाढले. बाहेरून आल्यानंतर हाताची स्वच्छता तर सुरू केलीच, शिवाय साबणाचा वापर आणि नियमित मास्कचा वापर सुरू केल्याने, कोरोनाशिवाय इतर होणाऱ्या आजारांपासून मात्र चांगलेच संरक्षण झाले.

चौकट

जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५० हजाराच्या उंबरठ्यावर असताना, कोरोनावर मात करणाऱ्यांचेही प्रमाण चांगले आहे. तरीही गेल्या दहा महिन्यांतील जिल्ह्याचा अनुभव आरोग्यविषयक जनजागृती करणारा ठरला आहे.

Web Title: Oximeter, sanitizer, thermal scanner became the password;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.