तालुकास्तरावर आता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:28 AM2021-05-27T04:28:27+5:302021-05-27T04:28:27+5:30
सांगली : कोरोना संसर्गामुळे ऑक्सिजनची गरज असलेल्या रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. वृध्द, दम्याचे, हृदयविकाराचा त्रास असलेल्या रूग्णांना उपचारानंतर ...
सांगली : कोरोना संसर्गामुळे ऑक्सिजनची गरज असलेल्या रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. वृध्द, दम्याचे, हृदयविकाराचा त्रास असलेल्या रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्यानंतरही ऑक्सिजनची गरज लागते. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हवेतील ऑक्सिजन घेऊन त्याचे शुध्दीकरण करून रूग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देत असते. त्यामुळे अशा रूग्णांना सिलिंडरची गरज भासत नाही. त्यामुळे अशा मशीन रूग्णांना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आता तालुकास्तरावर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, तालुकास्तरावरील या उपक्रमात गटविकास अधिकारी हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकेचे नोडल अधिकारी राहतील. तालुक्यातील सर्व लाभार्थींना या मशिन्स उपलब्ध होतील, याचे नियोजन त्यांनी करायचे आहे. यात रूग्णाची मशीनची गरज संपल्यानंतर ती पुन्हा जमा करायची आहे. त्यानंतर पुढील रूग्णाला ती उपलब्ध करून देता येणार आहे.
मशिन्स वापरण्यास देण्यापूर्वी तालुक्यातील डॉक्टरांची शिफारस असावी. तालुका पातळीवर तहसीलदार या उपक्रमाचे सनियंत्रण करणार आहेत. याचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट
जिल्ह्याला बिईंग ह्युमन फाऊंडेशन यांच्याकडून २५, स्वस्थ ॲण्ड ॲक्ट ग्रॅण्ड फाऊंडेशनकडून ३०, उपसंचालक कार्यालयाकडून २१ असे एकूण ७६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळाले आहेत. या ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे ग्रामीण रूग्णालय, आटपाडी ११, जत १०, कडेगाव ५, विटा ५, पलूस १०, तासगाव १०, उपजिल्हा रुग्णालय, शिराळा १०, उपजिल्हा रुग्णालय, इस्लामपूर ५, उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ १० असे वाटप करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.