मिरज सिव्हिलमध्ये ऑक्सिजन प्लांटची तपासणी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:21 AM2021-06-04T04:21:25+5:302021-06-04T04:21:25+5:30
मिरज : मिरज शासकीय कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन टँकच्या प्रेशर व्हाॅल्व्हमधून बुधवारी सुरू झालेली गळती सिव्हिलच्या तंत्रज्ञांनी दुरुस्त केल्याने अनर्थ ...
मिरज : मिरज शासकीय कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन टँकच्या प्रेशर व्हाॅल्व्हमधून बुधवारी सुरू झालेली गळती सिव्हिलच्या तंत्रज्ञांनी दुरुस्त केल्याने अनर्थ टळला. नाशिक दुर्घटनेनंतर मिरज सिव्हिलमधील ऑक्सिजन प्लांटची पाहणी करून व्यवस्थित असल्याचा निर्वाळा देण्यात आला होता. यामुळे सिव्हिलच्या प्लांटची तज्ज्ञांकडून पुन्हा एकदा तपासणी होणार आहे.
मिरज सिव्हिलमधील ऑक्सिजन प्लांटमधील सहा हजार लिटर क्षमतेच्या तीन टँकपैकी एका टँकच्या प्रेशर व्हाॅल्व्हमधून बुधवारी रात्री गळती सुरू झाल्याने सिव्हिल प्रशासनाची धावपळ उडाली होती. जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चाैधरी, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सिव्हिलमधील तंत्रज्ञ प्रसाद मोहिते व सुनील काेथळे यांनी दोन तासात प्रेशर व्हाॅल्व्हची दुरुस्ती केल्याने रुग्णांच्या ऑक्सिजन पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नाही. मिरज सिव्हिलच्या ऑक्सिजन प्लांटमध्ये ६ हजार लिटर क्षमतेचे तीन टँक असून या टँकमध्ये द्रवरुप ऑक्सिजन साठा करण्यात येतो. बुधवारी रात्री ९ वाजता ६ हजार लिटर क्षमतेच्या ज्या टँकमधून ऑक्सिजन गळती सुरू झाली त्या टँकमधून अतिदक्षता विभागात ऑक्सिजन पुरवठा सुरू होता. तिन्ही टँकमध्ये १८ हजार लिटर साठा होता. टँकमधून ऑक्सिजन पुरवठ्याचा दाब कायम ठेवण्यासाठी प्रेशर व्हाॅल्व्हचा वापर होतो. प्रेशर व्हाॅल्व्हची गळती काढण्यात आली असली तरी येथील ऑक्सिजन प्लँँटच्या तपासणीसाठी तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. बुधवारी रात्री प्रेशर व्हाॅल्व्हची गळती काढल्यानंतर पुन्हा काही बिघाड होऊ नये यासाठी सिव्हिलच्या तंत्रज्ञांनी रात्र जागून काढली. या गळतीचा कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजन पुरवठ्यावर कोणताही परिणाम होऊ दिला नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सिव्हिलच्या तंत्रज्ञांची प्रशंसा केली. महिन्यापूर्वी नाशिक येथील दुर्घटनेनंतर मिरज सिव्हिलमधील ऑक्सिजन प्लांटची पाहणी करून प्लांट व्यवस्थित असल्याचा निर्वाळा देण्यात आला होता.
चाैकट
मिरज शासकीय कोविड रुग्णालयात जिल्ह्याचे कोविड सेंटर असल्याने येथे गंभीर रुग्णांची संख्या मोठी आहे. सध्या येथे ३५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णसंख्या कमी होत असल्याने सिव्हिलचा दैनंदिन ऑक्सिजन वापर दररोज आठ हजारांवरून सात हजार लिटरपर्यंत आला आहे. रुग्णालयात ८० व्हेंटिलेटर, अतिदक्षता विभागातील शंभर बेडना अखंड ऑक्सिजन पुरवठा करण्यात येतो. येथील प्लांटमध्ये बिघाड अथवा गळतीमुळे ऑक्सिजन पुरवठा काही तासांसाठी थांबल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
चाैकट
मिरज सिव्हिलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यात येत आहे. दोन आठवड्यांत हा ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.