जिल्ह्याचा ऑक्सिजन कोटा ५४ टनांपर्यंत वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:24 AM2021-05-16T04:24:58+5:302021-05-16T04:24:58+5:30
सांगली : जिल्ह्याचा ऑक्सिजन कोटा दररोज ५४ टनांपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्याशिवाय रेमडेसिविरदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला ...
सांगली : जिल्ह्याचा ऑक्सिजन कोटा दररोज ५४ टनांपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्याशिवाय रेमडेसिविरदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे. शनिवारी विविध खासगी कोविड रुग्णालयांना १००० इंजेक्शन्स वितरित करण्यात आली.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा दररोज उच्चांक होत असल्याच्या स्थितीत ऑक्सिजनची मागणी दुपटीहून अधिक वाढली आहे. मार्चमध्ये दररोज २० टनांची गरज होती. मेमध्ये ती ४५ टनांपर्यंत पोहोचली. सध्या जिल्हाभरात ८८ कोविड रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार होतात. प्रत्येक ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था आहे. त्यामुळे मागणीही वाढली आहे. पंधरवड्यापूर्वी कर्नाटकच्या बेल्लारीहून पुरवठा थांबल्याने पुण्यातून उपलब्ध करण्यात आला. दररोज ४० टन ऑक्सिजन पुण्यातून मिळत होता. रुग्णसंख्या वाढत असल्याने सांगलीचा कोटा आता ५४ टनांपर्यंत वाढविण्यात आला आहे.
पुणे व रायगड येथील खासगी कंपन्यांमधून पुरवठा होत आहे. दररोज चार ते पाच टॅंकर्स येत आहेत. जिल्ह्याची सध्याची मागणी सरासरी ४५ ते ५० टनांपर्यंत आहे, त्या तुलनेत
सध्याचा पुरवठा पुरेसा ठरला आहे. काही कोविड रुग्णालयांना परवानगी ऑक्सिजन उपलब्ध होत नाही म्हणून खोळंबली होती, ती आता मिळण्याची शक्यता आहे. मुंबई, पुण्याची रुग्णसंख्या कमी झाल्याने रेमडेसिविर इंजेक्शन्सचा कोटादेखील वाढला आहे. शनिवारी १००० मिळाली, त्याशिवाय मिरज कोविड रुग्णालयांतही स्वतंत्र साठा आहे.
चौकट
मुंबई, पुण्याचे रुग्ण घटल्याचा फायदा
मुंबई आणि पुण्यातील रुग्णसंख्या घटल्याचा फायदा सांगलीला झाला आहे. या शहरांसाठी ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन्स व फेविपिरॅवीर गोळ्यांची गरज कमी झाली, त्यामुळे सांगलीला अतिरिक्त कोटा मिळाला. महिन्याभरापूर्वी सांगलीची रेमडेसिविरची दररोजची गरज १००० इंजेक्शन्सची असताना, उपलब्धता मात्र १०० पेक्षाही कमी होती. आज मात्र दिवसभरात १००० इंजेक्शन्स देण्यात आली.
चौकट
दृष्टिक्षेपात उपलब्धता...
- ऑक्सिजन - ५४ टन
- रेमडेसिविर इंजेक्शन्स - १०००
- एकूण कोविड रुग्णालये - ८८
कोट
सांगलीचा ऑक्सिजन कोटा ५४ टनांपर्यंत वाढला आहे. पुणे व रायगडमधून पुरवठा होईल. त्यामुळे सध्याची गरज भागत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन्सदेखील जास्त प्रमाणात मिळत आहेत.
- नितीन भांडारकर, सहाय्यक आयुक्त, अन्न व अैाषध प्रशासन