जिल्ह्यात ऑक्सिजन टंचाई कायम, दिवसभरात फक्त सात टन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:43 AM2021-05-05T04:43:05+5:302021-05-05T04:43:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात ऑक्सिजनची टंचाईस्थिती सोमवारीदेखील कायम राहिली. दिवसभरात फक्त सात टन ऑक्सिजन मिळाला. रात्री उशिरा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात ऑक्सिजनची टंचाईस्थिती सोमवारीदेखील कायम राहिली. दिवसभरात फक्त सात टन ऑक्सिजन मिळाला. रात्री उशिरा आणखी एक टँकर येणार होता. टंचाईस्थितीमुळे खुद्द रुग्णालयेच आता व्हेंटिलेटरवर आली आहेत. मंगळवारी (दि. ४) पुरेसा ऑक्सिजन मिळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात गुरुवारपासून ऑक्सिजनची टंचाईस्थिती असून डॉक्टर हवालदिल झाले आहेत. दररोजची मागणी २३ टनांवरून ४० टनांपर्यंत गेली आहे. पुरवठा मात्र २० टनांपेक्षा कमी आहे. उपलब्धतेसाठी जिल्हा प्रशासन युद्धस्तरावर प्रयत्न करत आहे. सोमवारी सकाळी बेल्लारीहून सात टन ऑक्सिजन घेऊन एक टँकर आला. त्याचे वितरण विविध रुग्णालयांना करण्यात आले. ड्युरा सिलिंडरमधून ऑक्सिजन पुरविण्यात आला. त्यामुळे डॉक्टरांना काहीसा दिलासा मिळाला. रात्री उशिरा आणखी एक टँकर येणार होता, शिवाय मंगळवारी सकाळीदेखील एक टँकर येईल, असे सांगण्यात आले.
दरम्यान, पालकमंत्री जयंत पाटील यांनीही ऑक्सिजन उपलब्धतेवर लक्ष ठेवले आहे. दररोज ४० टनाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कोविड रुग्णालयांनी एक दिवस पुरेल इतका ऑक्सिजन शिल्लक असतानाच प्रशासनाकडे नव्या पुरवठ्याची मागणी करावी, असेही ते म्हणाले.
चौकट
विश्वजित कदम यांनीही लक्ष घातले
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनीही जिल्ह्याच्या ऑक्सिजन पुरवठ्यात लक्ष घातले आहे. पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी जिल्ह्यासाठी अतिरिक्त कोटा उपलब्ध करून घेतल्याचे ते म्हणाले. दोन दिवसांत पुरवठा सुरळीत होईल, असा दावाही केला.