ऑक्सिटोसिनयुक्त दुधाने वाढतो हृदयरोगाचा धोका!, गायी-म्हशींना पाणवण्यासाठी इंजेक्शनचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 04:20 PM2022-11-19T16:20:14+5:302022-11-19T16:20:40+5:30
बंदी असताना काही मेडिकल स्टोअर्सवर हे इंजेक्शन मिळत असल्याने असे प्रकार सातत्याने घडत आहेत.
सांगली : गायी व म्हशींना दुधाचा पान्हा फुटण्यासाठी अनधिकृतपणे ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा वापर केला जातो. हे इंजेक्शन गुरांनाही घातक ठरते. इंजेक्शन देऊन काढलेल्या दुधाचे सेवन केल्यास हृदयाचे ठोके वाढण्याचा धोका निर्माण होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
गायी किंवा म्हशींना पाणवण्यासाठी ऑक्सिटोसिन इंजेक्शन दिल्यास त्या इंजेक्शनचा अंश दुधात उतरतो. असे दूध प्यायल्यास हृदयाची धडधड, पोटाचे विकार वाढणे, स्नायू कमकुवत होण्याचा त्रास वाढण्याची शक्यता असते. या इंजेक्शनचा वापर मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.
चोरीछुप्या पद्धतीने काही दूधविक्रेत्यांकडून सर्रासपणे ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा वापर करण्यात येत आहे. बंदी असताना काही मेडिकल स्टोअर्सवर हे इंजेक्शन मिळत असल्याने असे प्रकार सातत्याने घडत आहेत. परिणामी, यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून, गुरांनाही हे इंजेक्शन घातक ठरत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे ऑक्सिटोसिन वापरावर बंदी घालण्यात आल्याचेही जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने सांगितले. या इंजेक्शनची विक्री व वापर होत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
गाय, म्हशीला पान्हा फुटावा म्हणून...
दूध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या काही जणांकडून वासराला गायीजवळ न जाऊ देता ऑक्सिटोसिन इंजेक्शन देऊन पान्हा फोडतात. म्हशीला पान्हा फोडण्यासाठीही इंजेक्शनचा वापर होत आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भवतींसाठीही वापर
ऑक्सिटोसिन हे इंजेक्शन संप्रेरक असून, यामुळे गर्भवतीला प्रसूतीदरम्यान कळा येतात. तसेच दुधाचा पान्हाही फुटतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने या इंजेक्शनचा वापर होतो.
ऑक्सिटोसिनयुक्त दूध प्यायल्यास...
ऑक्सिटोसिनयुक्त दूध प्यायल्याने मानवाच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात. तसेच पोटाचे विकार होण्याची भीती असते, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
गायी किवा म्हशींना पान्हा फोडण्यासाठी ऑक्सिटोसिन या इंजेक्शनचा वापर करण्यावर बंदी आहे. गाय, म्हशीला इंजेक्शन देऊन पान्हा फोडल्यास त्या इंजेक्शनचा अंश दुधात उतरतो. तो माणसाच्या आरोग्यासाठी घातक आहे. त्याच बरोबर गुरांसाठीही हे इंजेक्शन धोक्याचे आहे. त्यामुळे या इंजेक्शनवर बंदी घालण्यात आली आहे. पशुपालकांनी या इंजेक्शनचा वापर करू नये. - सुकुमार चौगुले, अन्न व औषध प्रशासन अधिकारी.
ऑक्सिटोसिन हे इंजेक्शन गाय किंवा म्हशीसाठी वापरण्यावर बंदी आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा वापर करणे हा कायद्याने गुन्हा असून, तसे केल्यास संबंधित पशुपालकावर कारवाई करण्यात येईल. - डॉ. किरण पराग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प. सांगली.