ओझर्डेच्या शेतकऱ्याची शेती उभ्या ऊस पिकासह गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:28 AM2021-07-28T04:28:46+5:302021-07-28T04:28:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील रेठरे धरण- ओझर्डे हद्दीवर असणाऱ्या तिळगंगा नदीने पात्र बदलल्याने अनेक शेतकऱ्यांना कोट्यवधी ...

Ozarde's farmer's farm carried a vertical cane crop | ओझर्डेच्या शेतकऱ्याची शेती उभ्या ऊस पिकासह गेली वाहून

ओझर्डेच्या शेतकऱ्याची शेती उभ्या ऊस पिकासह गेली वाहून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील रेठरे धरण- ओझर्डे हद्दीवर असणाऱ्या तिळगंगा नदीने पात्र बदलल्याने अनेक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. ओझर्डे येथील जगदीश श्यामराव पाटील या शेतकऱ्याची तब्बल ३० गुंठे शेतीच उभ्या ऊस पिकासह वाहून गेली आहे. या नदीकिनारी असणारा दगडी संरक्षक बांध प्रवाहात वाहून गेल्याने मोठी हानी झाली आहे. या शेतकऱ्याचे अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

जगदीश पाटील हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेती हाच त्याचा व्यवसाय आहे. अवघी ३० गुंठे शेती असताना तेच संपूर्ण क्षेत्र ऊस पिकासह वाहून गेले. सात ते आठ महिन्यांपूर्वी त्यांनी ऊसाची लागण केली होती. मेहनत करण्यासाठी ७० हजार रुपये खर्च केला होता. शेतजमिनीच्या कडेने तिळगंगा नदीचे पात्र असल्याने अनेक शेतकऱ्यांनी दगडी तालीचे बांध घातले होते. त्यांच्या शेतीपासून अगदी जवळ ओढासदृश नदीवर छोटा सिमेंट बांध आहे. त्याच्या बाजूने मार्ग काढत पाण्याचा प्रवाह बाजूच्या शेतातील उभ्या पिकात पाणी घुसल्याने ओढ्याने पात्र बदलेले आहे.

जगदीश पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी सोसायटीचे कर्ज काढून शेतजमिनीला संरक्षक भिंत घातली होती. त्याला तब्बल तीन लाख रुपये असा खर्च आला होता. वीस फूट उंची असणारी आणि चारशे फूट लांब असणारी संरक्षक भिंत पाण्याच्या प्रचंड दाबाने फुटून ३० गुंठे जमीनच गायब झाली. या प्रकाराने त्यांचे कुटुंबीय हतबल झाले आहेत. कोरडवाहू शेती असल्याने ठिबक योजनेच्या माध्यमातून पाणी दिले जात होते. हे सर्व ठिबकचे पाइपलाइन संचही वाहून गेले आहेत. पाणी वाहून गेल्याच्या खुणा जमिनीवर दिसत आहेत. काही उभा ऊस आडवा झाला आहे.

पाटील यांना दोन मुले आहेत. पती-पत्नी, आई-मुलगा असे चौकोनी कुटुंब याच ३० गुंठे शेतीवर उदरनिर्वाह करीत होते. एक म्हैस आहे. तिला अन् कुटुंबाला जगवण्यासाठी आता रोजंदारी शिवाय पर्याय नाही. कोरोनामुळे हाताला काम मिळत नाही, पुढे करायचे काय? हा प्रश्न या कुटुंबापुढे निर्माण झाला आहे.

फोटो : २७ इस्लामपुर १..२..३

ओळ : ओझर्डे (ता. वाळवा) येथील शेतकऱ्याची ऊस पिकासह वाहून गेलेली शेती.

Web Title: Ozarde's farmer's farm carried a vertical cane crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.