भाजपचे आमदार पडळकर मनोरुग्ण, त्यांनीच दगडफेक करवून घेतली : संजय विभुते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 05:33 PM2021-07-02T17:33:10+5:302021-07-02T17:35:48+5:30
Gopichand Padalkar Bjp Sangli : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे मनोरुग्ण आहेत. टीकेशिवाय त्यांना काहीही येत नाही. सध्या ते खासगी सुरक्षारक्षक घेऊन फिरत आहेत. त्यांना शासकीय सुरक्षा व्यवस्था हवी असल्याने त्यांनीच दगडफेक करवून घेतली आहे. व्हिडीओ बारकाईने पाहिल्यास याची कल्पना येईल, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केला.
सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे मनोरुग्ण आहेत. टीकेशिवाय त्यांना काहीही येत नाही. सध्या ते खासगी सुरक्षारक्षक घेऊन फिरत आहेत. त्यांना शासकीय सुरक्षा व्यवस्था हवी असल्याने त्यांनीच दगडफेक करवून घेतली आहे. व्हिडीओ बारकाईने पाहिल्यास याची कल्पना येईल, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केला.
विभुते म्हणाले की, महेश जाधव हा सर्जन असताना त्याला कोविड रुग्णालय उभारण्यास परवानगी दिली. एका वाहनाच्या शोरुमच्या जागेत हे रुग्णालय उभारले गेले. एखाद्या रुग्णालयाला परवानगी देताना लावले जाणारे निकष डावलून ज्या समितीने व त्यातील अधिकाऱ्यांनी अपेक्स रुग्णालयाला परवानगी दिली तेसुद्धा याला जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनाही सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी आम्ही नगरविकास मंत्र्यांकडे केली आहे. त्यांनीही याची दखल घेतली आहे. येत्या सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटून याप्रकरणी निवेदन देण्यात येईल.
महेश जाधव याचे व अधिकाऱ्यांचे नेमके काय संबंध आहेत, याची तपासणी करण्यासाठी कॉल रेकॉर्ड, अधिकाऱ्यांच्या बंगल्यावरील सीसीटीव्ही फुटेज यांची मदत घ्यावी. वैयक्तिक हितसंबंधासाठी जर रुग्णांचा जीव डावावर लावला असेल तर अशा अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी. येत्या १५ दिवसांत चौकशी पूर्ण करुन कारवाईच्या हालचाली व्हाव्यात, अशी आमची प्रमुख मागणी आहे.
विभागीय चौकशीचे आदेश
आयुक्त नितीन कापडणीस यांच्या विभागीय चौकशीचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याविषयीचे लेखी पत्र येत्या पाच दिवसात प्राप्त होईल, अशी माहिती विभुते यांनी दिली.