शिराळ्यातील भातशेती महापुराने उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:24 AM2021-08-01T04:24:27+5:302021-08-01T04:24:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : वारणेच्या महापुरात शिराळा तालुक्यातील नदीकाठची भातशेती पूर्णतः नष्ट झाली आहे. काही शेतातील पीक वाहून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : वारणेच्या महापुरात शिराळा तालुक्यातील नदीकाठची भातशेती पूर्णतः नष्ट झाली आहे. काही शेतातील पीक वाहून गेले आहे. शेतकऱ्यांना हा जबर फटका असून त्यांचे डोळे आता सरकारी मदतीकडे लागले आहेत.
शिराळा तालुक्यातील महापूर आता जवळपास ओसरला आहे. मात्र, पुरानंतर शेतशिवारातील चित्र शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारे आहे. गेल्या काही महिन्यांत पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळलेली पिके महापुराने नामशेष केली आहेत. शिवारात आता केवळ पिकांचे अवशेष पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
वारणा काठावरील शिवारात चांदोलीपासून देववाडीपर्यंत मोठ्या प्रमाणात भातशेती होती. वारणाकाठ पिकांनी तरारून आला होता. शेतकऱ्यांनी कोमल, इंद्रायणी, बासमती, रत्ना १, सोनम अशा अनेक जातीची भातपिके घेतली होती. परंतु महापुराच्या पाण्याने शेतात सात ते आठ दिवस मुक्काम केल्याने होत्याचे नव्हते झाले. भाताची पिके तर अक्षरशः कुजून, वाहून गेली आहेत. ऊस पिकाला जबर फटका बसला आहे. पेरणीनंतर पिकांवर केलेला सर्व खर्च वाया गेला आहे. भात व ऊस ही हुकमी पिके उद्ध्वस्त झाल्याने शिवारात विदारक चित्र पहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांना रडू कोसळत आहे.
चौकट
धान्याची कमतरता जाणवणार
वारणा काठची भातशेती उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांना यंदा धान्याची कमतरता निश्चित जाणवणार आहे. तालुक्यातील असंख्य छोटे शेतकरी या शेतीवर वर्षाकाठीचा उदरनिर्वाह करतात. असंख्य शेतकरी व्यापारी तत्त्वावर भातशेती करतात. पुराने सर्व हिरावल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.