‘पद्मावती’ प्रदर्शित होऊ देणार नाही : सांगलीत शिवप्रतिष्ठानचा इशारा, संजय लीला भन्साळी यांच्या पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:12 AM2017-12-03T01:12:57+5:302017-12-03T01:13:56+5:30
सांगली : ‘पद्मावती’ चित्रपटाच्या निषेधार्थ शनिवारी शिवप्रतिष्ठानतर्फे सांगलीत निषेध मोर्चा काढण्यात आला. पद्मावती चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे स्टेशन चौकातील मुक्ता चित्रपटगृहासमोर दहन करण्यात आले.
सांगली : ‘पद्मावती’ चित्रपटाच्या निषेधार्थ शनिवारी शिवप्रतिष्ठानतर्फे सांगलीत निषेध मोर्चा काढण्यात आला. पद्मावती चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे स्टेशन चौकातील मुक्ता चित्रपटगृहासमोर दहन करण्यात आले. महाराष्टÑात कोणत्याही चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इसा इशारा शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी दिला.
संजय लीला भन्साळी यांचा पद्मावती हा चित्रपट सुरुवातीपासूनच वादात सापडला आहे. चित्रपटात महाराणी पद्मावती यांच्याबद्दल आक्षेपार्ह द्दश्ये असून, त्याला ऐतिहासिक संदर्भ नसल्याचा आरोप करीत राजस्थानमध्ये करनी सेनेने या चित्रपटाचे चित्रीकरण बंद पाडले होते. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा परिसरातही या चित्रपटाच्या चित्रीकरणास विरोध करीत चित्रीकरणाचा सेट रात्रीच्यावेळी पेटवून देण्यात आला होता. अशा अनेक अडचणींचा प्रवास करुन या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होऊन तो प्रदर्शित होत असताना, त्यास देशभरातून विरोध झाला आहे. शिवप्रतिष्ठाननेही त्याला विरोध केला.
मारुती चौकातील शिवतीर्थपासून शनिवारी सकाळी शिवप्रतिष्ठानच्यावतीने दुचाकी निषेध मोर्चाला सुरुवात झाली. स्टेशन चौकातील मुक्त चित्रपटगृहासमोर हा मोर्चा आला. तिथे पद्मावती चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यानंतर हा मोर्चा बदाम चौक, हिराबाग कॉर्नर, पंचमुखी मारुती रस्ता, सिव्हिल चौक, चांदणी चौक, विश्रामबाग गणपती मंदिर, शंभरफुटी रस्ता या मार्गावरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी), कार्यवाह नितीन चौगुले, मोहनसिंग राजपूत, विश्वजित पाटील, सचिन पाटील, विज्ञान माने, अविनाश सावंत, राजेंद्र शहापुरे, शिवाजीराव गायकवाड, आनंदराव चव्हाण, अक्षय पाटील, राजेंद्र पुजारी, सूरज कोळी आदी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी विजय काळम यांनाही पद्मावती चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी देऊ नये, या मागणीचे निवेदन देण्यात आले. मुक्ता चित्रपटगृहाचे व्यवस्थापक विनायक खारपुडे यांनाही पद्मावती चित्रपट प्रदर्शित करू नये, या मागणीचे निवेदन दिले.