पॅगो-रिक्षाचालकांतील वाद पेटला..!
By admin | Published: July 7, 2015 11:37 PM2015-07-07T23:37:08+5:302015-07-07T23:37:08+5:30
दररोज मारामारी : टप्पा वाहतुकीवरून संघर्ष, अधिकाऱ्यांची बोटचेपी भूमिका
सांगली : सांगली-मिरज मार्ग आणि या दोन्ही शहरात अॅपे पॅगो रिक्षाचालकांच्या सुरू असलेल्या टप्पा वाहतुकीच्या वादाने सध्या चांगलाच पेट घेतला आहे. टप्पा वाहतुकीस तीनआसनी रिक्षाचालकांचा विरोध आहे. यातून त्यांच्यात दररोज वाद व मारामारीचे प्रकार घडत आहेत. तीनआसनी रिक्षा संघटनेने यापूर्वी जिल्हा पोलीसप्रमुख व आरटीओंना टप्पा वाहतूक बंद करण्यासाठी अनेकदा निवेदन दिले आहे. पण हा विषय निकालात काढण्यासाठी एकही अधिकारी पुढाकार घेत नसल्याने वाद वाढत चाललाय. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
पॅगो डिझेल रिक्षाच्या टप्पा वाहतुकीमुळे आमचा व्यवसाय मोडकळीस आला असल्याचे तीनआसनी चालकांचे म्हणणे आहे. सांगली-मिरज मार्गावर दररोज पाचशे पॅगो चालक टप्पा वाहतूक करीत आहेत. सरसकट मिरजेला जाणारे प्रवासी न घेता ते शहरात कुठेही थांबून प्रवासी घेत आहेत. शहरातील स्थानिक रिक्षा व्यवसायावर त्यांनी कब्जा केला आहे. यामुळे पेट्रोल रिक्षाचालकांचा व्यवसाय संकटात सापडला आहे. दिवसभर रांगेत थांबून त्यांना शंभर रुपयेही पगार पडत नाही. प्रवासी घेण्यास विरोध केला, तर तीनआसनी चालकांच्या अंगावर ते धावून येऊन, जिवंत ठेवणार नाही, अशी भाषा करीत आहेत. दररोज शहरात कुठे ना कुठे त्यांच्यात मारामारी होतच आहे. या वादाला कुठे तरी पूर्णविराम मिळण्याची गरज आहे.
पोलीस व आरटीओ बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे हा प्रश्न पेटतच आहे. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. शहर पोलीस ठाण्याच्यासमोर तर दररोज मारामारी होत आहे. मंगळवारी दुपारी एक पॅगोचालक प्रवासी भरीत होता. त्यावेळी तीनआसनी चालकाने त्यास विरोध केल्यानंतर पॅगोचालकाने त्याच्या अंगावर रिक्षा घातली. या प्रकारामुळे काही तणाव निर्माण झाला होता.
पोलीस ठाणे जवळ असूनही ते गांधीरीची भूमिका घेत असल्याने तीनआसनी रिक्षाचालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. येत्या चार-पाच दिवसात यासंदर्भात कोणताही निर्णय न झाल्यास तीनआसनी रिक्षा चालक बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्याच्या तयारी आहेत. (प्रतिनिधी)
तीन आसनी चालकांमध्ये खदखदसांगली जिल्हा रिक्षाचालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव पवार म्हणाले, पॅगोची टप्पा वाहतूक बंद करावी, यासाठी गतवर्षी आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी टप्पा वाहतूक बंद करण्याचे आदेश देऊन तसे संघटनेला लेखी पत्र दिले होते. पण आरटीओ व वाहतूक शाखेतील अधिकारी, कर्मचारी या आदेशाची अंमलबजावणी करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत.
पॅगो डिझेल रिक्षाच्या टप्पा वाहतुकीमुळे आमचा व्यवसाय मोडकळीस आला असल्याचे तीनआसनी चालकांचे म्हणणे आहे. सांगली-मिरज मार्गावर दररोज पाचशे पॅगो चालक टप्पा वाहतूक करीत आहेत. सरसकट मिरजेला जाणारे प्रवासी न घेता ते शहरात कुठेही थांबून प्रवासी घेत आहेत. शहरातील स्थानिक रिक्षा व्यवसायावर त्यांनी कब्जा केला आहे, यामुळे तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांमध्ये खदखद सुरू आहे.