डाळिंबाला आता ‘अ‍ॅपल बोर’ शेतीचा पर्याय...

By admin | Published: December 15, 2014 11:04 PM2014-12-15T23:04:32+5:302014-12-16T23:44:21+5:30

प्रथमच लागवड : मिरज पूर्व, जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग

Palegranate's 'Apple Bore' farming option now ... | डाळिंबाला आता ‘अ‍ॅपल बोर’ शेतीचा पर्याय...

डाळिंबाला आता ‘अ‍ॅपल बोर’ शेतीचा पर्याय...

Next

प्रवीण जगताप - लिंगनूर -पाणी कमी तरीही उत्पन्नाची हमी, हे सूत्र ज्या पिकांना लागू होते, ती पिके घेण्यात दुष्काळी टापू अग्रेसर असतो. काही ठिकाणी पाण्याच्या कमतरतेमुळे नाईलाजास्तव अशा पिकांची निवड केली जाते. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर व मंगळवेढा परिसरात आढळणाऱ्या बोरांची शेती मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील काही गावात केली जात आहे. अशात बांगला देशातून आलेल्या नव्या ‘अ‍ॅपल बोर’चे नवीन प्रयोग जानराववाडी (ता. मिरज) व आटपाडकर वस्ती कोंगनोळी परिसर (ता. कवठेमहांकाळ, चाबुकस्वारवाडी व कोंगनोळी हद्दीच्या सीमेवर) येथील चार शेतकऱ्यांनी केला आहे.
जिल्ह्यातील मिरज पूर्व, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात डाळिंब पिकाचे पारंपरिक उत्पादक आहेत. तीन-चार वर्षांपासून तेल्या, बिब्ब्या या रोगांनी उत्पादकांना पुरते हैराण करून सोडले आहे. यामुळे बसणारी आर्थिक झळ लक्षात घेता काही शेतकरी पीक बदलण्यासाठी डाळिंब पिकाला पर्याय म्हणून बोर फळशेतीचा निर्णय उत्पादक घेऊ लागले आहेत.
‘उमराण चमेली’ या पारंपरिक जातींऐवजी काहींनी ‘अ‍ॅपल बोर’ ही जात निवडून त्याची प्रथमच लागवड केली आहे. यंदा त्याचा बहार सुरू झाला असून, या जातीस जागेवर २५ रुपये प्रति किलोचा भाव मिळू लागला आहे. त्यामुळे चांगले मार्केट मिळत राहिल्यास व उत्पादकांची संख्या वाहतुकीसाठी वाढल्यास या उत्पादकांनी क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
२५ ते ४० रुपयांपर्यंत सोलापूर, कोल्हापूर व सांगली येथे मार्केट मिळत आहे. स्थानिक व्यापारीही यांची जागेवरच खरेदी क रू लागले आहेत. किरकोळ विक्रीतही प्रतिसाद मिळत आहे, तर मुंबई येथे दर्जेदार बोरांना ५० रुपयांपर्यंत दर मिळू शकेल, असा विश्वास उत्पादकांना आहे.
या जातीचे एक झाड सुमारे २० वर्षे जगते. झाडाला दोनवेळा पावसाळा व हिवाळा असा बहर घेता येतो. पण काही उत्पादक एकदाच चांगला बहर घेतात. मार्चमध्ये छाटणी घेतली जाते. प्रतिझाड ५० ते ८० किलो फळ लागवड होते. प्रत्येक बोराचे वजन ६० ते १०० ग्रॅमपर्यंत भरते. झाडे कायम हिरवीगार राहतात. सामान्य खते, ठिबक, कीटकनाशक फवारणी व फळ बहरात राखण असे किरकोळ कमी जोखमीचे, कमी खर्चाचे व्यवस्थापन आहे. माळरान मुरमाड डोंगराळ दुष्काळी टापूत हे पीक घेता येते. एकरी एक ते दोन टनापर्यंत उत्पादन घेतल्याची उदाहरणे आहेत. चांगले मार्केट व चांगला दर मिळाल्यास किमान अडीच लाख व जास्तीत-जास्त सहा लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे याचा प्रयोग भविष्यात वाढू शकतो.


सांगोला परिसरातून रोपे आणून डाळिंबाच्या रोगांना वैतागून काही नवीन प्रयोग करण्याच्या प्रयत्नात याची लागवड केली आहे. आमचे क्षेत्र मर्यादित असल्याने लांबच्या मार्के टपर्यंत वाहतूक खर्च करून परवडत नसल्याने जागेवरच स्थानिक व्यापाऱ्यांना व स्वत: काही बाजार करून २५ रुपये किलोचा दर मिळत आहे. पण उत्पादकांची संख्या वाढत राहिल्यास व फळाची क्रेझ वाढल्यास क्षेत्र वाढविणे व लांबच्या मार्केटमध्ये माल नेणे शक्य होणार आहे.’
- उद्धव आटपाडकर, उत्पादक, आटपाडकर वस्ती, कोंगनोळी.

Web Title: Palegranate's 'Apple Bore' farming option now ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.