महापालिकेतील पदाच्या पालख्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:18 AM2021-06-17T04:18:24+5:302021-06-17T04:18:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना, संभाव्य महापुराच्या संकटात महापालिकेकडे सक्षम अधिकाऱ्यांची वानवा आहे. पालिका आस्थापनेवरील ८१२ पदे रिक्त ...

Palkha on the shoulders of the officer in charge of the post in the Municipal Corporation | महापालिकेतील पदाच्या पालख्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर

महापालिकेतील पदाच्या पालख्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोना, संभाव्य महापुराच्या संकटात महापालिकेकडे सक्षम अधिकाऱ्यांची वानवा आहे. पालिका आस्थापनेवरील ८१२ पदे रिक्त आहेत. अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखापरीक्षक, सहाय्यक आयुक्त अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मनुष्यबळच उपलब्ध नाही. एकेका अधिकाऱ्यांकडे तीन ते चार विभागांचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. रिक्त पदांच्या दुष्काळात कामचलाऊ अधिकाऱ्यांच्या जीवावर महापालिकेची ढकलगाडी सुरू आहे.

महापालिकेच्या आस्थापनेवर २,३७७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १,५६४ पदे भरली आहेत तर ८१२ पदे रिक्त आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांची महापालिका अस्तित्वात आल्यापासून स्टाफ पॅटर्न तोच आहे. गेल्या २२ वर्षांत शहराची लोकसंख्या आणि विस्तार वाढला. पण त्या प्रमाणात आस्थापनावरील पदांची संख्या वाढलेली नाही. त्यात आधीच रिक्त असलेल्या पदांवरही भरती झालेली नाही. गेल्या वर्षभरात अनेक अधिकारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागीही नवीन अधिकारी नियुक्त करण्यात आलेला नाही. चार ते पाच वर्षात रिक्त पदांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

सध्या अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखापरीक्षक, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सहाय्यक संचालक नगररचना, नगररचनाकार, प्रशासकीय अधिकारी, नगरसचिव, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता, जलनि:स्सारण अभियंता, कामगार अधिकारी, करनिर्धारक, मालमत्ता व्यवस्थापक, अंतर्गत लेखापरीक्षक या पदांचा भार प्रभारींच्या हाती सोपविण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची मानधनावर नियुक्ती केली आहे. एकेका अधिकाऱ्यांकडे दोन ते तीन पदांचा भार आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभारात ढिसाळपणा दिसून येतो. गतिमान प्रशासनाचा कुठेच लवलेश दिसून येत नाही.

अपुऱ्या मनुष्यबळाच्या आधारावर गेले वर्षभर महापालिका यंत्रणा कोरोनाशी मुकाबला करत आहे. कार्यालयीन कामकाज सांभाळून कोविड ड्युटीही अधिकाऱ्यांना पार पाडावी लागत आहे. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण जाणवतो. त्यात शहरावर महापुराची छायाही आहे. संभाव्य महापुराची तयारीही पालिकेला करावी लागणार आहे. संकट काळात रिक्त पदांचा दुष्काळ असल्याने प्रशासकीय कामकाजात अनेक अडचणी येत आहेत.

गेल्या चार ते पाच वर्षात दोनशेहून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त झाले. पण त्या जागा भरल्या गेल्या नाहीत. यापूर्वी २००४ साली महापालिकेत नोकरभरती झाली होती. त्यानंतर आजअखेर जवळपास १७ वर्षे नोकरभरतीच झालेली नाही. अपुऱ्या व अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर महापालिकेचा गाडा सुरू आहे.

चौकट

तिजोरीच्या चाव्याही प्रभारींकडे

महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्याही प्रभारींच्या हाती आहेत. गेल्या दोन वर्षापासून मुख्य लेखापरीक्षक हे पद रिक्त आहे. संजय गोसावी यांच्या आकस्मिक निधनानंतर या पदावर शासन नियुक्त अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. मुख्य लेखाधिकारी सध्या रजेवर आहेत. अंतर्गत लेखापरीक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अर्थकारणात ढिसाळपणा दिसून येतो.

चौकट

रिक्त पदांची स्थिती

वर्ग मंजूर कार्यरत रिक्त

१. १८ - ९ - ९

२. ३६ - १३ - २३

३. ८५५ - ४७५ - ३८०

४. १४६८ - १०६८ - ४००

एकूण २३७७ - १५६४ - ८१२

Web Title: Palkha on the shoulders of the officer in charge of the post in the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.