पलूस कुपोषण मुक्तीच्या मार्गावर -: नवनवीन योजनांना नागरिकांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:03 PM2019-07-17T22:03:16+5:302019-07-17T22:09:19+5:30
४ दुर्धर म्हणजे काहींना हृदयविकार आहे, तर काही अस्थिव्यंग आहेत. ही सर्व मुले सामान्य कुटुंबातून आहेत.
अशुतोष कस्तुरे ।
पलूस : पंचायत समितीचा महिला व बालकल्याण विभाग आणि नागरिकांच्या मदतीने पलूस तालुका कुपोषण मुक्तीच्या मार्गावर आहे. तालुक्यातील ० ते ६ वयोगटातील कुपोषित मुलांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. शासन स्तरावरुन कुपोषण मुक्तीसाठी केलेले प्रयत्न फळास येत आहेत.
गतवर्षी तालुक्यात वजनानुसार ३६, तर उंचीनुसार ९० बालके कुपोषित होती. त्यांची संख्या यावर्षी घटून वजनानुसार ३०, तर उंचीनुसार २२ राहिलेली आहेत. पैकी त्यातीलही ४ दुर्धर म्हणजे काहींना हृदयविकार आहे, तर काही अस्थिव्यंग आहेत. ही सर्व मुले सामान्य कुटुंबातून आहेत.
उंचीनुसार प्रकारात कुपोषणाच्या तीव्रतेनुसार त्यांच्यात सॅम आणि मॅम असे दोन प्रकार पडतात. गतवर्षी सॅम म्हणजे तीव्र कुपोषितांमध्ये २५ बालके होती, ती सध्या ७ आहेत, तर मॅम म्हणजे कमी तीव्र कुपोषितांमध्ये ६५ बालके होती, ती सध्या १५ बालके राहिली आहेत.
जिल्हा परिषद पूर्ण जिल्हाभर कुपोषण मुक्तीची चळवळ राबवित आहे. त्याचाच भाग म्हणून पलूस पंचायत समितीच्या महिला बालकल्याण विभागाकडून तालुक्यात कुपोषण मुक्तीची मोहीम राबविण्यात येत आहे. त्याला बऱ्याच प्रमाणात यश येताना दिसत आहे. या विभागाकडून अंगणवाडीमधील प्रत्येक बालकावर वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने नवनवीन योजना राबवित आहे. येथील विद्यार्थांना व्हीसीडीसीच्या माध्यमातून दिवसातून ८ वेळा गहू आणि मुगाची लापसी तयार करुन दिली जाते. तसेच इडीएनएफच्या माध्यमातून मुलांच्या आवडीनुसार दिवसातून ४ वेळा खाण्यासाठी खाऊ दिला जातो. तसेच तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतींना पत्र पाठवून अशा बालकांवर विशेष लक्ष देण्याचीही विनंती करण्यात आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सहकार्याने गृहभेटी घेऊन पालकांचे समुपदेशन करण्यावर भर देण्यात येत आहे आणि अशा बालकांच्या आहारावर विशेष लक्ष देण्याबाबत सुचविले जात आहे. या माध्यमातून पलूस तालुका कुपोषणमुक्त करण्याचा प्रशासनाच्यावतीने प्रयत्न सुरू आहे.
तालुक्यात उंचीनुसार गाववार कुपोषित बालके
गाव सॅमनुसार मॅमनुसार
संख्या संख्या
बुर्ली १ १
अंकलखोप २ ५
सावंतपूर १ —
कुंडल ३ २
आमणापूर — १
भिलवडी — २
पलूस — २
बांबवडे — २
एकूण ७ १५
वजनानुसार गाववार कुपोषित बालके
गाव संख्या
बुर्ली २
अंकलखोप ४
सावंतपूर २
कुंडल ४
आमणापूर २
भिलवडी ३
पलूस ४
रामानंदनगर ३
दुधोंडी ४
नागराळे २
एकूण ३०