पलूस तालुक्यात निवडणुकीसाठी रस्सीखेच
By admin | Published: October 9, 2015 10:53 PM2015-10-09T22:53:15+5:302015-10-09T22:53:15+5:30
११ ग्रामपंचायती : काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपमध्ये स्पर्धा
किरण सावंत -- किर्लोस्करवाडी--पलूस तालुक्यात होत असलेल्या चौदा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून, पक्षामध्ये उमेदवार ओढण्यासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे.
चौदापैकी ११ ग्रामपंचायतींवर माजी मंत्री, काँग्रेसचे आमदार डॉ. पतंगराव कदम गटाची सत्ता आहे. मोराळे ग्रामपंचायतीमध्ये कॉँग्रेस व राष्ट्रवादीची संयुक्त सत्ता आहे. अटीतटीच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आंधळी, नागराळे, दह्यारी या तीन ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे नेते क्रांती उद्योग समूहाचे अध्यक्ष अरुण लाड व भाजपचे नेते पृथ्वीराज देशमुख यांच्या गटाची सत्ता आहे. कॉँग्रेसने ग्रामपंचायतीवरील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी डॉ. पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीने जोरदार तयारी सुरू आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष शरद लाड यांनी चौदा ग्रामपंचायतींमध्ये सत्ता आणण्यासाठी अग्रेसर भूमिका घेतली आहे. सध्या लाड यांनी गावोगावी जाऊन, कार्यकर्त्यांच्या बैठक सुरू केल्या आहेत. त्यांनी युवकांना एकत्र आणून मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे दिसत आहे. अरुण लाड व पृथ्वीराज देशमुख हेही गावोगावी कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीमध्ये शक्य तितक्या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी-भाजप युतीचा झेंडा फडकविण्याचा चंग त्यांनी बांधला आहे.
पुढीलवर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी शरद लाड यांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे समजते. कुंडल जिल्हा परिषद मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समजते. त्यामुळेच त्यांची ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसत आहे.
लाड-देशमुख व कदम गटांना ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. तशी दोन्ही गटांकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. मतदार कोणाला कौल देणार, हे ३ नोव्हेंबर रोजी कळणार आहे.
काँग्रेसची कसोटी
चौदापैकी ११ ग्रामपंचायतींवर माजी मंत्री, काँग्रेसचे आमदार डॉ. पतंगराव कदम गटाची सत्ता आहे. मोराळे ग्रामपंचायतीमध्ये कॉँग्रेस व राष्ट्रवादीची संयुक्त सत्ता आहे. ११ ग्रामपंचायतींची सत्ता टिकविण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची चांगलीच कसोटी लागणार आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांची दमछाक होणार आहे. तसेच भाजप या निवडणुकीत किती जागा घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.