पावसाने दडी मारल्याने पान उत्पादक हताश
By Admin | Published: July 16, 2015 11:15 PM2015-07-16T23:15:27+5:302015-07-16T23:15:27+5:30
उत्पादनात घट : पंधरा दिवसांनी येणारा खुड्याचा फेर तीस दिवसांवर गेला; बाजारात दरही घसरले
दिलीप कुंभार-नरवाड -सध्या पावसाने ओढ दिल्याने लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांवर कंगाल होण्याची वेळ आली आहे.उन्हामुळे होरपळून निघालेल्या पान उत्पादकांना पावसाळ्यात रिमझीम पाऊस आणि ढगाळ हवामानाची अपेक्षा होती, मात्र पानवेलींच्या वाढीसाठी पोषक हवामान नसल्याने पानांच्या फुटव्यावर परिणाम झाला आहे. १५ दिवसांनी येणारा खुड्याचा फेर ३० दिवसांवर गेला आहे. याशिवाय पान बाजार पेठेत देखील खाऊच्या पानांना कवडीमोलाची किंमत मिळत असल्याने, पान उत्पादकांवर कंगाल होण्याची वेळ आली आहे.पान व्यापाऱ्यांवर मात्र कोणताही परिणाम दिसून येत नसून उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा सारखाच असल्याने, नेहमीच लक्ष्मीच्या पावली कमिशन चालून येत असते. पान उत्पादकांना पानमळ्याचे व्यवस्थापन करताना नाकीनऊ होत असून, खुडेकरी आणि वेल बांधणारे यांची मजुरी भागविताना दमछाक होत आहे. ३ वर्षापासून प्रथमच पान उत्पादकांवर मंदीचे सावट कायम असून नेहमी ७०० ते ९०० रूपयांना विकली जाणारी १० कवळ्यांची एक करंडी अवघ्या २०० ते २५० रुपयांना विकली जात आहे. याशिवाय फापडा पानांच्या एका करंडीला किमान मिळणारा ३००० रुपये दर १००० रुपयांवर येऊन पोहोचला असल्याने पान उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
पान बाजारपेठेत मंदीचे सावट असल्याने कामगारांचा खर्च भागवून हाती काहीच पडत नाही. पानमळ्यात दर नाही म्हणून पाने ठेवल्यास, ती कालांतराने खराब होतात. खाऊची पाने नाशवंत असल्याने बाजारभावाचा विचार न करता पाने खुडावीच लागतात, अशीही माहिती त्यांनी दिली. भविष्यात अशीच स्थिती कायम राहिल्यास पानमळ्यांचे क्षेत्र वेगाने कमी होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
- मधुकर जाधव, पान उत्पादक शेतकरी
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, चांदवड, रत्नागिरी, सांगोला, उस्मानाबाद आदी पान बाजारपेठा सध्या मंदीच्या खाईत लोटल्या आहेत. मद्रासी पानांची पान बाजारपेठेतील आवक कमी होऊनही, देशी पानांना फारशी मागणी नसल्याने पान बाजारपेठेत मंदीचे सावट कायम आहे.