कडेगाव-पलूसमध्ये पंचरंगी सामना
By admin | Published: October 1, 2014 10:20 PM2014-10-01T22:20:05+5:302014-10-02T00:16:53+5:30
संदीप राजोबा यांची बंडखोरी : मतविभागणीचा फटका कोणाला?
प्रताप महाडिक- कडेगाव--पलूस तालुका विधानसभा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांनी बंडखोरी केली आहे. काँग्रेसचे उमेदवार डॉ. पतंगराव कदम व भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख या प्रमुख उमेदवारांसह राष्ट्रवादीच्या सुरेखा लाड, शिवसेनेचे प्रवीण ऊर्फ लालासाहेब गोंदील आणि अपक्ष संदीप राजोबा यांच्यात पंचरंगी निवडणूक होईल. याशिवाय मनसेचे अंकुश पाटील, बसपाचे बजरंग दंडवते, लोकशासन आंदोलन पक्षाचे सर्जेराव राजवस यांच्यासह अन्य अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. मतविभागणीचा फटका कोणाला बसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघातून अमोल पाटील, विलास कदम, राजेश तिरमारे, मोहनराव यादव, भरत यादव, सुगंध वाघमारे, सतीश कदम, हिंमत घाडगे, महादेव होवाळ, वांगी येथील पतंगराव कदम, संजय विभुते या ११ उमेदवारांनी माघार घेतली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम विकासकामांच्या मुद्यावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्यासमोर भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांचे आव्हान आहेच, याशिवाय संदीप राजोबा यांच्या बंडखोरीने जैन समाजाची मते डॉ. पतंगराव कदम यांना मिळणार, की त्यामध्ये घट होणार याबाबतही चर्चा सुरू आहे. तरीही विरोधकांतील मतविभागणीचा फायदा डॉ. कदम यांना होणार, असा दावा कदम समर्थक करत आहेत.
डॉ. पतंगराव कदम यांच्यासमोर भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांचे प्रमुख आव्हान आहे. आता संदीप राजोबा यांच्या उमेदवारीमुळे कदमविरोधक एकसंध राखण्याचे आव्हान पृथ्वीराज देशमुख यांच्यासमोर आहे.
‘स्वाभिमानी’चे संदीप राजोबा यांनी बंडखोरी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामुळे डॉ. कदम व पृथ्वीराज देशमुख यांच्यातील सत्तासंघर्षात संदीप राजोबा तिसरी शक्ती म्हणून पुढे येत आहेत.
राष्ट्रवादीकडून कुंडलच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा लाड याही रिंगणात उतरल्या आहेत. पृथ्वीराज देशमुख भाजपमध्ये गेल्यामुळे या मतदारसंघातील राष्ट्रवादीची ताकद क्षीण झाली आहे. तरीही सुरेखा लाड कुंडल परिसर आणि मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावर निवडणूक लढवत आहेत. क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांच्या गटाने पृथ्वीराज देशमुख यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांवरच सुरेखा लाड यांची भीस्त आहे.
शिवसेनेकडून प्रवीण ऊर्फ लालासाहेब गोंदील निवडणूक लढवत आहेत. शिवसैनिक एकसंध करून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. या प्रमुख पाच उमेदवारांशिवाय बजरंग दंडवते (बसप), अंकुश पाटील (मनसे), सर्जेराव राजवस (लोकशासन आंदोलन पक्ष) हेही पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. संदीप राजोबा यांच्याशिवाय जयसिंगराव थोरात, आनंदा नालगे, विजय खाडे हे अपक्ष निवडणुकीला सामोरे जात आहेत. नेहमीच कदम-देशमुख सत्तासंघर्ष अनुभवणाऱ्या मतदारांना यावेळी पहिल्यांदाच बहुरंगी लढत पाहावयास मिळत आहे. मतविभागणीचा फायदा कोणाला मिळणार, यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.
नावपक्ष
डॉ. पतंगराव कदम काँग्रेस
पृथ्वीराज देशमुख भाजप
सौ. सुरेखा लाड राष्ट्रवादी
संदीप राजोबा अपक्ष
लालासाहेब गोंदीलशिवसेना
अंकुश पाटील मनसे
बजरंग दंडवते बसपा
सर्जेराव राजवस लोकशासन
आंदोलन पक्ष
जयसिंगराव थोरात अपक्ष
आनंदा नालगे अपक्ष
विजय खाडे अपक्ष