Sangli- लोकमत इम्पॅक्ट: ‘म्हैसाळ’ योजनेने नुकसानग्रस्तांच्या पिकांचे पंचनामे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 02:35 PM2023-10-20T14:35:49+5:302023-10-20T14:37:20+5:30

‘ओव्हर फ्लो’ झाल्याने पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान

Panchnama of crops affected by Mhaisal scheme | Sangli- लोकमत इम्पॅक्ट: ‘म्हैसाळ’ योजनेने नुकसानग्रस्तांच्या पिकांचे पंचनामे

Sangli- लोकमत इम्पॅक्ट: ‘म्हैसाळ’ योजनेने नुकसानग्रस्तांच्या पिकांचे पंचनामे

सुशांत घोरपडे

म्हैसाळ : म्हैसाळ योजनेच्या ‘ओव्हर फ्लो’ ला जबाबदार कोण ? शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान या मथळ्याखाली दैनिक ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची दखल घेत पालकमंत्री सुरेश खाडे यांनी प्रशासनाला आदेश दिले होते. त्यानुसार आरगचे गाव कामगार तलाठी प्रमोद कोळी व कृषी सहायक शशिकांत सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले.

२३ व २९ सप्टेंबरला म्हैसाळ योजनेचा टप्पा क्रमांक चार व पाच ‘ओव्हर फ्लो’ झाले होते. त्यात कोबी, ऊस, भेंडी, कोथिंबीर या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. वारंवार होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला होता. आरग येथील शेतकरी गोपाळ कोरे, दत्ता कोरे, ओंकार शिंदे, मच्छिंद्र पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.

याबाबत पालकमंत्री डॉ. खाडे यांनी पाटबंधारे अधिकारी व शेतकऱ्यांची बैठक घेत समस्या जाणून घेतल्या. वारंवार ‘ओव्हर फ्लो’ होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यांची काळजी घेण्याचे आदेश दिले. झालेल्या पंचनाम्यावर पालकमंत्री डॉ. खाडे यांनी स्वाक्षरी करून पुढील कार्यवाहीसाठी पाठविला आहे. यावेळी डॉ. अनिल कोरबू, माजी उपसरपंच प्रशांत गायकवाड, प्रकाश गायकवाड, पोपट गुंजाळे आदी उपस्थित होते.

दिवाळीपर्यंत भरपाई मिळणार का?

आरगेचे गाव कामगार तलाठी व कृषी सहायक यांनी शेतात जाऊन १३ शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामे केली. अंदाजे सात लाख रुपयापर्यंत नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. नुकसान भरपाई दिवाळीपर्यंत मिळण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

पालकमंत्री सुरेश खाडे यांनी यांची तत्काळ दखल घेत पाटबंधारे अधिकारी व शेतकऱ्यांची बैठक घेतली आहे. पंचनामे झाले आहेत. या प्रश्नावर ‘लोकमत’ने आवाज उठविला त्याबद्दल धन्यवाद. - डॉ. अनिल कोरबू, माजी उपसरपंच,आरग
 

एक ते पाच टप्प्यावर वारंवार ओव्हर फ्लो होऊन पाणी वाया जाते. विजेचे नुकसान होते. शेतकऱ्यांचे नुकसान होते. याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर पाटबंधारे विभागाने कारवाई करावी. - परेश शिंदे-म्हैसाळकर, माजी उपसरपंच-म्हैसाळ

Web Title: Panchnama of crops affected by Mhaisal scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.