नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत! पालकमंत्री हारतुऱ्यांत, खासदार फोडाफोडीत, आमदार दिवाळीच्या जल्लोषात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 04:34 PM2022-10-26T16:34:39+5:302022-10-26T16:35:04+5:30

पावसामुळे झालेल्या पीकहानीच्या पंचनाम्याचे आदेश निघालेत; पण प्रशासन ‘दिवाळीनंतर बघू’ या भूमिकेत

Panchnama order of crop loss due to rain issued; But the administration in the role of see after Diwali | नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत! पालकमंत्री हारतुऱ्यांत, खासदार फोडाफोडीत, आमदार दिवाळीच्या जल्लोषात

नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत! पालकमंत्री हारतुऱ्यांत, खासदार फोडाफोडीत, आमदार दिवाळीच्या जल्लोषात

googlenewsNext

सांगली : पालकमंत्र्यांची नव्याची नवलाई अजूनही संपलेली नाही. खासदारांना तासगाव-कवठेमहांकाळच्या राजकारणातून फुरसत नाही. आमदार दिवाळीच्या गोडधोडात रमलेत आणि प्रशासन दिवाळी सुट्ट्यांच्या मूडमध्ये आहे. यामध्ये शेतकऱ्याला मात्र कोणीच वाली नसल्याची स्थिती आहे.

पावसामुळे झालेल्या पीकहानीच्या पंचनाम्याचे आदेश निघालेत; पण प्रशासन ‘दिवाळीनंतर बघू’ या भूमिकेत आहे. तासगावमध्ये काही प्रमाणात पंचनामे सुरू झालेत; पण अन्यत्र आनंदी आनंद आहे. पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत कुजलेले पीक शेतातच ठेवणे शेतकऱ्याला शक्य नाही. त्याला रब्बीचा हंगाम साधायचा आहे. त्यामुळे कुजलेली पिके काढून नव्या पेरणीकडे शेतकरी वळले आहेत. पाऊस थांबल्यावर आठ-दहा दिवसांनी प्रशासन कशाचे पंचनामे करणार, असा प्रश्न आहे.

जिल्ह्यात ७० टक्के सोयाबीनची काढणी खोळंबली आहे. मका, उडीद, मूग शेतातच कुजले आहे. फडात पाणी उभे राहिल्याने ऊस तोडायचा कसा? अशी समस्या ऊसकरी शेतकऱ्यांपुढे आहे. परतीच्या पावसाने माघार घेतली असली तरी जाता-जाता त्याने घातलेल्या धिंगाण्याचे मोजमाप होईल या भाबड्या आशेत शेतकरी आहेत.

आभार दौरे आणि हारतुऱ्यांतून पालकमंत्र्यांना सवड मिळेना

पालकमंत्रिपदी नियुक्तीपासून सुरेश खाडे यांचे ‘नॉनस्टॉप’ दौरे सुरू आहेत. मिरज मतदारसंघात दररोज चार-पाच गावांत सभा होताहेत. कार्यकर्त्यांनी प्रेमाने घातलेल्या हारतुऱ्यांमध्ये अक्षरश: डुबून गेले आहेत. या गर्दीतून त्यांना नुकसानग्रस्त शेतकरी कधी दिसणार, असा प्रश्न आहे.

खासदार फोडाफोडीत अडकले

खासदार संजयकाका पाटील यांना तासगाव आणि कवठेमहांकाळमधील राजकीय फोडाफोडीचे काम लागले आहे. नगरपंचायतीवर सत्ता आणल्याशिवाय कवठेमहांकाळच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसले जाणार नाहीत असे त्यांना वाटत असावे. या व्यापात त्यांना दिल्लीतून केंद्राचे पथक पाहणीसाठी आणायचे असते याचाही विसर पडला आहे.

महसूलच्या संपाचे विघ्न

दिवाळीअगोदरपासून महसूलचे कर्मचारी संपावर आहेत. पंचनाम्यासाठी महत्त्वाचा घटक असलेला तलाठी संपावर असल्याने पंचनामे कसे होणार, असा प्रश्न आहे.

उसात आंतरपीक म्हणून घेतलेले सोयाबीन हाताला लागले नाही. मोठा खर्च करून सोयाबीन आणले; पण सरीमध्ये पाणी साचून राहिले. शेंगामधून कोंब फुटले. पंचनाम्याची वाट पाहतोय. - रमेश जाधव, शेतकरी, येलूर (ता. वाळवा)
 

शेतकरी रब्बीच्या कामांत गुंतला असताना आता पंचनामे कशाचे करणार? आदेश येऊनही पंचनामे नाहीत. याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारणार आहोत. - महेश खराडे, स्वाभिमानी संघटना

Web Title: Panchnama order of crop loss due to rain issued; But the administration in the role of see after Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.