पावसाने नुकसानीचे आजपासून पंचनामे
By admin | Published: December 14, 2014 12:39 AM2014-12-14T00:39:03+5:302014-12-14T00:40:45+5:30
तीन तालुक्यांत अवकाळी : ८२४ हेक्टर बाधित; द्राक्ष, ज्वारी, डाळिंबाचे नुकसान
सांगली : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष, ज्वारी व डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने केलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये खानापूर, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील ८२४ हेक्टरमधील पिकांना याचा फटका बसला आहे. याचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने शनिवारी दिले. आज, रविवारपासून पंचनाम्यांना सुरुवात होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत अवकाळी पाऊस झाला आहे; मात्र तासगाव, कवठेमहांकाळ व खानापूर तालुक्यात सर्वांत जास्त पाऊस झाला आहे. अवकाळी पावसामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील २५ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बहुतांश द्राक्ष पिकाचा समावेश आहे. तसेच खानापूर तालुक्यातील ४५३ हेक्टरमधील ज्वारीचे, द्राक्षाचे २८ हेक्टर व डाळिंबाचे १८ हेक्टरचे नुकसान झाले आहे. तासगाव तालुक्यात २५० हेक्टरवरील ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. एकूण बाधित क्षेत्रातील नुकसान ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्यातील ५,३४० हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. प्रशासनाच्यावतीने पंचनामे पूर्ण केले असून, मदतीसाठी राज्य शासनाकडे शिफारस केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळीने द्राक्ष, डाळिंब, केळी व इतर पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी होत होती. त्यानुसार पंचनामे केले. यामध्ये ४ हजार २९६.७४ हेक्टर पिकांचे नुकसान हे ५० टक्क्याच्या आतील, तर १ हजार ४३ हेक्टर क्षेत्रातील नुकसान ५० टक्क्याच्या वर झाले आहे. त्यामुळे पंधरवड्यात सहा हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)