कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात फलक युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:25 AM2021-04-13T04:25:40+5:302021-04-13T04:25:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर सहकार पॅनेल आणि संस्थापक पॅनेलने कार्यक्षेत्रातील ...

Panel war in the work area of Krishna factory | कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात फलक युद्ध

कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात फलक युद्ध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर सहकार पॅनेल आणि संस्थापक पॅनेलने कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात प्रचाराचे फलक लावले आहेत. या जाहिरातबाजीवर रयत पॅनेलचे डॉ. इंद्रजित मोहिते यांनी सोशल मीडिया, बैठकांतून टीका केली आहे.

सहकार पॅनेलचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी प्रत्येक गावात प्रचाराचे फलक लावले आहेत. त्यावर ‘कर्तव्यदक्ष चेअरमन’, ‘आम्ही सुरेशबाबांसोबतच’, ‘आमचं पण ठरलंय, कृष्णेतील सुरेशबाबाचं काम सभासदांच्या मनात पक्क भरलंय’ अशा स्लोगन आहेत. त्याच फलकांसमोर संस्थापक पॅनेलने अविनाश मोहिते यांचे फलक लावून ‘कृष्णेत सत्तांतराचे वारे’, ‘आमचं ठरलंय’, ‘आता बदल हा नक्की होणार’ अशा स्लोगनमधून सहकार पॅनेलला आव्हान दिले आहे.

या दोन्ही पॅनेलच्या भूमिकेवर डॉ. इंद्रजित मोहिते यांनी टीका केली आहे. विशेषत: सहकार पॅनेलचे डॉ. भोसले यांच्या नावाचा उल्लेख टाळून त्यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. ऊस तोडणीतील भ्रष्टाचार, चुकीच्या नोंदी, ऊस वाळणे आणि नंतर पेटवून परत गाळपाला नेणे, मशीनतोड झाल्यानंतर तुकडे उचलण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे खर्च करावे लागणे, उसाला पाणी न मिळता बैठी पाणीपट्टी आकारणे, काही पाणीपुरवठा योजना बंद पडल्या, तरीसुद्धा नफा सांगणे, इतर कारखान्यांपेक्षा आपला दर कमी असूनही चांगला दर दिल्याचे सांगणे यावर टीका केली आहे. ऊस उत्पादकांच्या विरोधात हे होत असताना कर्तव्यदक्ष चेअरमन कुठे गेले होते, असा सवाल डॉ. मोहिते यांनी उपस्थित केला आहे.

चौकट

अव्वल नंबरची चोरी

सभासदाला अफूच्या गोळीसारखा सामाजिक बांधिलकीचा युक्तिवाद देऊन स्वार्थ साधण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट असून, तो कारखान्याचा आहे, असा भास करून शेतकऱ्याला आणि सभासदांना लुटले, असा आरोप डॉ. इंद्रजित मोहिते सहकार पॅनेलचे नाव न घेता करत आहेत.

Web Title: Panel war in the work area of Krishna factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.