आष्ट्याच्या शिवारात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:19 AM2021-07-01T04:19:58+5:302021-07-01T04:19:58+5:30
आष्टा : आष्टा शहरात मंगळवारी (दि. २९) रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली. बुधवारी दिवसभर पोलिसांसह वन विभागाचे अधिकारी ...
आष्टा : आष्टा शहरात मंगळवारी (दि. २९) रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली. बुधवारी दिवसभर पोलिसांसह वन विभागाचे अधिकारी बिबट्याचा माग काढत हाेते. शहरातील महिमान मळ्यानजीक उसाच्या शेतात बिबट्याच्या पायांचे ठसे मिळाले; पण बिबट्याचा शाेध लागला नव्हता. रात्री उशिरा महिमान मळा परिसरातच एका भटक्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरल्याचे चित्र हाेते.
आष्टा येथे मंगळवारी रात्री पोलीस ठाणे ते शिंदे चौक या मार्गावर काही युवकांना बिबट्या दिसला. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. आष्टा पोलीस व वन विभागाने रात्री दोन वाजेपर्यंत बिबट्याचा शोध घेतला. मात्र बिबट्या आढळला नाही.
बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून पोलीस निरीक्षक अजित सिद, सांगलीचे साहाय्यक वनसंरक्षक व्ही. जे. गोसावी, शिराळाचे वनक्षेत्रपाल एस. आर. काळे, वनरक्षक दीपाली सागावकर, रायना पाटोळे, इस्लामपूरचे वनपाल सुरेश चरापले, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, वनमजूर निवास उघडे, भगवान गायकवाड, बाबासाहेब गायकवाड यांनी पुन्हा बिबट्याचा शोध सुरू केला.
आष्टा पोलीस ठाण्यापाठीमागील महिमान मळा परिसरात उसाच्या शेतात बिबट्याच्या पायांचे ठसे मिळाले.
वनक्षेत्रपाल एस. आर. काळे म्हणाले, 'आष्टा परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसे मिळाले आहेत. त्यामुळे बिबट्या या परिसरात रात्री आला होता हे निश्चित आहे. त्याच्या पायांचे ठसे मिळाले आहेत. नागरिकांनी बिबट्याबाबत सावधानता बाळगावी. या परिसरात ट्रॅप कॅमेरा लावणार आहोत. बिबट्याबाबत काही माहिती मिळाल्यास १९२६ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
फोटो : ३० आष्टा २..३
आष्टा येथील महिमान मळ्यातील उसाच्या शेतात बिबट्याच्या पायांचे ठसे मिळाले.
आष्टा येथील महिमान मळा परिसरात पाेलीस व वन विभागाच्या पथकाने बिबट्याचा शोध घेतला.