सांगलीत चोरट्यांची दहशत, भरदिवसा दोन पोलिसांचे फ्लॅट फोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 01:32 PM2022-07-28T13:32:10+5:302022-07-28T13:32:47+5:30
चोरट्यांनी पाळत ठेवूनच दोन्ही ठिकाणी कोणीही नाही याची संधी साधत फ्लॅट फोडल्याचा अंदाज आहे.
सांगली : शहरातील कुपवाड रोडवरील माळी मंगल कार्यालय परिसरात असलेल्या अपार्टमेंटमधील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे भरदिवसा फ्लॅट फोडून चोरट्यांनी सुमारे साडेआठ तोळे सोन्याचे दागिने व तीन हजार रुपये राेकड लंपास केली. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरातील नेमका किती ऐवज व रक्कम लंपास झाली याबाबत माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
कुपवाड रोडपासून जवळच असलेल्या माळी मंगल कार्यालय परिसरात कृष्णकुंज अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले संदीप मोरे व सांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी पूजा खाडे राहण्यास आहेत.
बुधवारी मोरे यांचे कुटुंबीय परगावी गेल्याने ते फ्लॅटला कुलूप लावून ड्युटीवर गेले होते, तर खाडे या एकट्याच राहत असल्याने त्याही कुलूप लावून गेल्या होत्या. सकाळी अकरा ते दुपारी दीड या कालावधीत कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी दोन्ही फ्लॅट फोडले. यात मोरे यांच्या फ्लॅटमधून सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले, तर खाडे यांच्या फ्लॅटमधून दोन तोळ्यांचे दागिने लंपास करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संजय क्षीरसागर यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. फ्लॅटमधील चोरीप्रकरणी दोन्ही पोलिसांकडून फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे नेमका किती ऐवज व रक्कम चोरीस गेली याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, चोरट्यांनी पाळत ठेवूनच दोन्ही ठिकाणी कोणीही नाही याची संधी साधत फ्लॅट फोडल्याचा अंदाज आहे.
श्नानपथकाकडून तपासणी
चोरीच्या घटनेनंतर ठसेतज्ज्ञांनी भेट देऊन नमुने घेतले, तर श्वान पथकाने पाठीमागील बाजूचा मार्ग दाखविला. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.