पंचनाम्यास मिळाला मुहूर्त

By admin | Published: June 18, 2015 11:54 PM2015-06-18T23:54:22+5:302015-06-19T00:19:53+5:30

कापसाचे नुकसान : शास्त्रज्ञांचे पथक आटपाडीत दाखल

Pankanamas got the Muhurta | पंचनाम्यास मिळाला मुहूर्त

पंचनाम्यास मिळाला मुहूर्त

Next

अविनाश बाड-आटपाडी -अखेर राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांना आटपाडी तालुक्यातील नुकसान झालेल्या कापसाच्या शेतीची पाहणी करण्यासाठी मुहूर्त सापडला. गुरुवारी या विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पातील डॉ. अधिर आहेर आणि डॉ. नीलेश पवार या शास्त्रज्ञांनी तालुक्यातील कापसाच्या शेतीची पाहणी केली. यंदा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना २० कोटींचा फटका बसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
आटपाडी तालुक्यातील ५०० हेक्टर शेतातील उन्हाळी हंगामातील कापसाची लागवड पूर्णपणे वाया गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. कापसाचे बियाणे भेसळयुक्त असल्याने उगवण नीट झाली नाही. उगवणीनंतर ३ महिन्यांत पाच ते साडेपाच फूट उंच वाढण्याऐवजी केवळ फूट-दीड फूटच वाढ झाली. झाडाला २०० ते २५० फुलांऐवजी एखादे फूल लागल्याची तक्रार केली होती. यानंतर कृषी विभागाकडे यातील तज्ज्ञ व्यक्ती नसल्याने त्यांनी राहुरीच्या कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांना पाठविण्यात येईल, असे सांगितले. मात्र तक्रारीनंतर पाच, सहा दिवस कोणीच न आल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर आज (गुरुवारी) राहुरी विद्यापीठाच्या डॉ. आहेर आणि डॉ. पवार यांनी नेलकरंजी, औटेवाडी, धावडवाडी, मानेवाडी, मेटकरीवाडी, पिंपरी, खरसुंडी, निंबवडे येथील वाया गेलेल्या कापसाच्या शेतीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय कृषी अधिकारी जे. जी. कवडे, तालुका कृषी अधिकारी अशोक होलमुखे, कृषी अधिकारी चंद्रकांत माळी उपस्थित होते. या पाहणीबाबत या नुकसानीस कारणीभूत असणारा स्पष्ट अहवाल दोन दिवसात देणार आहे. शास्त्रज्ञांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी जे. जी. कवडे यांनी दिली.


वादावादी...
कृषी शास्त्रज्ञांसाह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक पाहणीसाठी गावोगावी गेल्यानंतर तिथे बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि दुकानदार उपस्थित होते. त्यांची आणि शेतकऱ्यांची अनेक ठिकाणी जोरदार वादावादी झाली. आमचा एकरी १५ हजार रुपये खर्च झाला असून, बियाणे उत्पादक कंपन्यांकडून या खर्चासह नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.


या भागातील शेतकऱ्यांनी कृषीधन कंपनीचे सुपर फायबर ४0७ आणि ग्रीन गोल्ड कंपनीचे कविता या दोनच जातीची लागवड केली आहे. पाहणी केली असता सर्वत्र दोष आढळले. बियाणांमध्ये थोडीफार गफलत आहे, पण ठामपणे आताच सांगता येणार नाही. शेतकऱ्यांच्याही चुका आहेत. त्यांनी हलक्या जमिनीत कापसाची लागवड केली आहे. विद्यापीठाच्यावतीने या भागात ‘नॉन-बी टी’ वाणाची लागवड करावी, अशी शिफारस केली जाते. अन्यथा बी. टी. वाणाची लागवड शेतकऱ्यांनी २५ मे नंतर करावी.
- डॉ. अधिर आहेर, शास्त्रज्ञ, राहुरी


या भागातील कापसाच्या सर्वेक्षणात शेतकऱ्यांनी मुुख्यत: बी. टी. वाणाच्या दोनच आंतरजातीय वाणाची लागवड केली आहे. अमेरिका आणि इजिप्त येथील वाणांच्या संकरातून उत्पादित केलेले हे वाण आहे. उन्हाळ्यात तापमान जास्त राहिल्याने कापसाच्या झाडामध्ये अनेक बदल होतात. हलक्या जमिनीत लागवड केलेल्या ४० ते ५० टक्के कापसाच्या पिकात आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसून आली आहेत. मात्र एकाच निकषावर निष्कर्ष काढता येणार नाही.
- डॉ. नीलेश पवार, कृषी शास्त्रज्ञ, राहुरी

Web Title: Pankanamas got the Muhurta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.