मृतदेहांसोबत आमचे भविष्यही स्मशानातच गाडायचे की काय?, मृतदेहांसाठी खड्डे काढणाऱ्या परशुरामचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 06:28 PM2022-07-23T18:28:55+5:302022-07-23T18:29:15+5:30
हे काय जगणे झाले का साहेब?, पोराबाळांची लग्ने कशी व्हायची
सांगली : गोकाक तालुक्यातील परशुराम हुळ्ळूरकर पोटाची आग विझविण्यासाठी सांगलीत आला. नवरा-बायको मिळून दफनभूमीत खड्डे काढायचे काम पत्करले. पाहता पाहता १८ वर्षे झाली, पण या कामातून त्याची सुटका झाली नाही. आता मुलगाही याच कामाला जुंपला गेलाय. मृतदेहांसोबत आमचे भविष्यही खड्ड्यातच गाडायचे काय?, असा त्याचा सवाल लोकप्रतिनिधींच्या कानावर पोहोचलाच नाही.
हरिपूर रस्त्यावर लिंगायत स्मशानभूमीत परशुराम पत्नी व दोन मुलांसोबत राहतो. काम संपल्यावर वणवण सुरू झाली. कंत्राटदाराने दफनभूमीतील काम सुचविले. लिंगायत स्मशानभूमीत मृतदेह पुरण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम मिळाले. उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला.
हे काय जगणे झाले का साहेब?
स्मशानातच मिळालेल्या घरात आम्ही राहतो. पावसात घरभर गळती होते. अशावेळी रात्रभर घराबाहेर अंगणात स्मशानाकडे पाहत बसून राहतो. याला जगणे कसे म्हणायचे? असे वाटल्यावाचून राहत नाही.
कधी एक, तर कधी तीन-चार
- कोणीतरी मृत झाल्यावर. दफनासाठी खड्डा काढतो, तेव्हाच चार पैसे मिळतात.
- कधी आठवड्यात एखादेच मृत येते, तर कधी चार-चारही येतात.
आता तर मुलेही बिनधास्त झाली.....
परशुराम म्हणतात, सुरुवातीला स्मशानात राहायला भीती वाटायची. पण नंतर सवय होत गेली. आता तर मुलेही बिनधास्त झाली आहेत. लहानगा किरण तर दफनासाठी खड्डा काढण्याचे कामही करत आहे.
पोराबाळांची लग्ने कशी व्हायची?
परशुराम म्हणतात, आम्ही नवराबायकोने स्मशानात आयुष्य काढले, पण स्मशानात राहणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली कोण देणार, याची चिंता आहे.
पुढील पिढीही स्मशानातच
मोठा मुलगा शंकरने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आता त्याला कोठेतरी कामावर चिकटविण्यासाठी धडपड सुरू आहे. लहानगा किरण मात्र माझ्यासोबतच स्मशानात खड्डे काढायचे काम करत त्याचे शिक्षण फारसे झाले नाही.