हाॅटेल, रेस्टाॅरन्समधून पार्सल सेवा तर भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:26 AM2021-04-15T04:26:22+5:302021-04-15T04:26:22+5:30
सांगली : संचारबंदीच्या काळात हाॅटेल, रेस्टाॅरन्समधून पार्सल सेवेला परवानगी असली तरी नागरिकांना जाऊन पार्सल आणता येणार नाही, तसेच भाजीपाला, ...
सांगली : संचारबंदीच्या काळात हाॅटेल, रेस्टाॅरन्समधून पार्सल सेवेला परवानगी असली तरी नागरिकांना जाऊन पार्सल आणता येणार नाही, तसेच भाजीपाला, फळ विक्रेत्यांनी रस्त्यावर बसून व्यवसाय करण्यासही मनाई असल्याचे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
ब्रेक द चेन उपक्रमांतर्गंत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. दरम्यान या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. यात लग्न समारंभास २५ लोकांच्या उपस्थितीत परवानगी दिली जाईल. अंत्यसंस्कार, दक्षक्रिया विधी जास्तीत जास्त २० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनचालकांना संचारबंदीतून वगळण्यात आले आहे. तसेच घरगुती कामगार, स्वयंपाकी यांनाही परवानगी देण्यात आली आहे.
हौसिंग सोसायटीमध्ये पाचपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास ही सोसायटी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येईल. याठिकाणी बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. या नियमांचे पालन न केल्यास दहा हजारांचा दंडही भरावा लागेल, असे आयुक्त कापडणीस यांनी स्पष्ट केले.
चौकट
हे राहणार बंद
१. सिनेमागृह, नाट्यगृह, मनोरंजन पार्क, व्हिडिओ गेम पार्लर, वाॅटरपार्क, जलतरण तलाव, जीम, क्रीडा संकुल.
२. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने, माॅल्स, शाॅपिग सेंटर बंद
३. सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी बंद असतील. दैनंदिन पूजाअर्चा करण्यास परवानगी
४. खासगी बसमध्ये उभ्याने प्रवास करण्यास बंदी
५. स्पा, सलून, ब्युटी पार्लर, केश कर्तनालय
६. सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
चौकट
हे चालू राहणार
१. घरगुती काम करणारे कामगार, अत्यावश्यक सेवेतील वाहनचालक, स्वयंपाकी यांना परवानगी
२. खानावळी, हाॅटेल, रेस्टाॅरन्टमधून पार्सल सेवेला परवानगी
३. किराणा, डेअरी, बेकरी व सर्व प्रकारची खाद्य पदार्थाची दुकाने
४. भाजीपाला, फळ विक्रेत्यांना घरोघरी फिरून विक्रीस परवानगी
५. फेरीवाल्यांकडून पार्सल घेऊन जाण्यास परवानगी
६. रेल्वे, बस, विमानसेवामधून प्रवास करणाऱ्यांनी अधिकृत तिकीट असल्यास स्थानकापर्यंत जाण्यास परवानगी
७. वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके यांच्या छपाई व वितरणास परवानगी