तुतारी पथकांचा कर्नाटकात डंका , पश्चिम महाराष्टचा सहभाग : श्रवणबेळगोळ येथील महामस्तकाभिषेक सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 02:05 AM2018-02-25T02:05:34+5:302018-02-25T02:05:34+5:30
शिरटे : श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महावीरांच्या महामस्तकाभिषेक सोहळ्यामध्ये सांगली व कºहाड परिसरातील १०८ बहाद्दर तुतारी वादकांनी तुतारीने अवघा परिसर चैतन्यदायी करून सोडला.
निवास पवार।
शिरटे : श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महावीरांच्या महामस्तकाभिषेक सोहळ्यामध्ये सांगली व कºहाड परिसरातील १०८ बहाद्दर तुतारी वादकांनी तुतारीने अवघा परिसर चैतन्यदायी करून सोडला. त्यांच्या तुतारीने महामस्तकाभिषेक सोहळ्यात पंचप्राण फुंकल्याची भावना येथे सहभागी झालेल्या भाविकांनी व्यक्त केली. भव्य-दिव्य शोभायात्रेमध्येही महाराष्ट्राच्या तुतारीने कर्नाटकातील विंध्यगिरीचा परिसर दुमदुमून टाकला होता.
श्रवणबेळगोळ येथे आचार्य वर्धमान सागर महाराज यांच्या पावन सान्निध्यात व भट्टारक महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली भगवान बाहुबली महावीरांचा महामस्तकाभिषेक सोहळा उत्साहात सुरूआहे. या उत्सव समितीच्या सदस्या गीतांजली उपाध्ये (सांगली) यांच्या सहकार्याने शिवकालीन तुतारी लोककला मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग गुरव (वाटेगाव) यांच्या अध्यक्षतेखाली रत्नदीप गुरव (उंडाळे), महेश गुरव (करमाळे), कृष्णत गुरव (कार्वे), माणिक गुरव (शिरटे) व सचिन गुरव (तळबीड, ता. कºहाड) यांच्यासह सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील १०८ तुतारी वादकांनी कला सादर करून उपस्थित भाविकांची मने जिंकली. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.
या सोहळ्यात विंध्यगिरी पर्वताच्या परिसरात १६ फेबु्रवारी रोजी सुमारे सहा किलोमीटरपर्यंत लांबीची शोभायात्रा निघाली होती. त्यामध्ये तीर्थंकारांची पालखी, ६ शास्त्र ग्रंथ, सोन्या व चांदीचा लेप दिलेले ८ चित्ररथ, मंगल कलश घेऊन श्राविका, पंचरंगी ध्वज घेऊन श्रावक, श्राविका, २०० बँड व त्यामध्ये असणाºया महाराष्ट्रातील या १०८ तुतारीवादकांनी कलेचे सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
दहा दिवसांच्या कालावधीसाठी या सर्व तुतारीवादकांना निमंत्रित करण्यात आले होते. परंतु या सर्व कलाकारांचे काम पाहून येथील आयोजकांनी आणखी ८ दिवस थांबण्याची विनंती केली. या त्यांच्या कलेचा सन्मान म्हणून श्रवणबेळगोळ मठाचे प्रमुख कर्मयोगी जगद्गुरू भट्टारक महास्वामी आणि आचार्य पुष्पदंत महाराज यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र व बाहुबली भगवान यांचे शिल्ड भेट देण्यात आले.
बारा वर्षांतून एकदा साजºया होणाºया महामस्तकाभिषेक सोहळ्यात तुतारी वादनाची संधी मिळाली, हे आमचे भाग्यच आहे. तसेच गुरव समाजाचा हा सन्मान आहे. बाहेरील राज्यांप्रमाणे आपल्या भागातही तुतारीला सन्मान मिळणे गरजेचे आहे. अन्यथा ही कला लोप पावण्यास वेळ लागणार नाही.
- माणिक गुरव, शिरटे (तुतारीवादक)