मिरजेत शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडीत पालकमंत्र्यांचा कुटुंबासह सहभाग
By श्रीनिवास नागे | Published: June 29, 2023 06:08 PM2023-06-29T18:08:03+5:302023-06-29T18:09:11+5:30
मिरज : मिरजेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी झाली. शालेय मुलांच्या बाल दिंडीत रिंगण सोहळा पार पडला. पालकमंत्री सुरेश खाडे ...
मिरज : मिरजेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी झाली. शालेय मुलांच्या बाल दिंडीत रिंगण सोहळा पार पडला. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सहकुटुंब रिंगण सोहळ्यात सहभागी होऊन फुगडी खेळत आनंद साजरा केला.
मिरजेत दत्त चौक येथून आषाढी एकादशीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी दिंडी काढली. लक्ष्मी मार्केटात दिंडीचा रिंगण व पालखी सोहळा पार पडला. यावेळी लेझीम, कबड्डी यासह विविध पारंपरिक खेळ खेळण्यात आले. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पत्नी सुमन व कुटुंबियांसह दिंडीत सहभागी होऊन फुगडीचा फेर धरला.
विद्यार्थ्यांच्या दिंडीत टाळ-मृदुंगासह डोक्यावर तुळशी घेऊन संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत नामदेव यांच्यासह संतांच्या वेशभूषेत बालके सहभागी होती. बालचमूंच्या दिंडीचा समारोप काशीविश्वेश्वर मंदिरामध्ये विठ्ठलाच्या आरतीने करण्यात आला.
यावेळी सागर वनखंडे मित्र परिवाराकडून फराळाचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री खाडे यांनी ‘पाऊस चांगला पडू दे’, असे साकडे पांडुरंगाला घातल्याचे सांगितले. यावेळी मकरंद देशपांडे, सुशांत खाडे, प्रा. मोहन वनखंडे, नगरसेविका अनिता वनखंडे, बाबासाहेब आळतेकर, गजेंद्र कुल्लोळी, माधव गाडगीळ, ओंकार शुक्ल, पांडुरंग कोरे उपस्थित होते.
शहरात विविध ठिकाणी विठ्ठल मंदिरांत विठूनामाच्या जयघोषात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. खणीवरचे विठ्ठल मंदिर, गर्डर विठ्ठल मंदिर, संत तुकाराम महाराज मंदिर, दिंडीवेस, नदीवेस आणि मालगाव वेस, रामलिंग येथील विठ्ठल मंदिरांत विठ्ठल भक्तांची सकाळपासून दर्शनासाठी गर्दी होती.