मुख्यमंत्र्यावर टीका करून पक्ष वाढत नाही - राजेश क्षीरसागर
By शीतल पाटील | Published: October 20, 2023 07:19 PM2023-10-20T19:19:07+5:302023-10-20T19:19:53+5:30
अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना काय केले?
सांगली : उद्धव ठाकरे गटाकडून राज्य सरकारच्याविरोधात होऊ द्या चर्चा मोहिम सुरू आहे. पण भावनात्मक होऊन टीका करून पक्ष वाढत नसतो. त्यांच्या चर्चेला आम्ही उत्तर देण्यास तयार आहोत. कुठल्या चौकात यायचे, ते सांगावे, असे आव्हान राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी दिले.
क्षीरसागर शुक्रवारी सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ठाकरे गट होऊ द्या चर्चा कार्यक्रम घेत आहे. पण अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना काय केले? कोरोनाच्या नावाखाली ठाकरे घरात बसले होते. उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या काळातही रस्त्यावर उतरून लोकांना मदत करीत होते. शिंदे यांच्यावर टीका करून पक्ष वाढणार नाही. त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याची लायकी नाही. तरीही आम्ही चर्चेला तयार आहोत.
केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. शासन आपल्या दारी उपक्रमाचा लाखो लोकांना फायदा झाला. मित्रा उपक्रमातून कृष्णा खोऱ्यासह राज्यातील १४ अपूर्ण प्रकल्प पूर्ण केले जाणर आहे. त्यासाठी १२६७ कोटी निधी लागणार असून जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन प्रकल्प पूर्ण केले जातील. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांदी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजन, श्रावण बाळ सेवा निवृत्त वेतन योजनेच्या अनुदानात वाढ केली. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेला १९८६ कोटी मंजूर केले. कुपवाड ड्रेनेज योजना, इस्लामपूरला भाजी मंडई, नगरपालिकेची अद्यावत इमारत अशा अनेक कामासाठी निधी दिला आहे.
पालकमंत्र्यांना जाब विचारू
विविध शासकीय समित्यात शिंदे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना स्थान दिले जात नसल्याचे निदर्शनास आणून देताच क्षीरसागर म्हणाले की, शासकीय समित्या व निधी वाटपाबाबत राज्यपातळीवर फाॅर्म्युला ठरला आहे. पालकमंत्र्यांना त्याचे पालन करावे लागेल. लवकरच पालकमंत्र्यासोबत शिंदे गटाची बैठक घेऊन त्यांना विचारणा करू.
राष्ट्रवादीशी आघाडी केंद्राचा निर्णय
राष्ट्रवादीतील एक गट महायुतीत सहभागी झाला. हा निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात आला. काही गोष्टी नाईलाजाने स्वीकारल्या लागतात. पण अजित पवार आमच्याच विचाराने काम करीत असल्याची टिप्पणीही क्षीरसागर यांनी केली.