नवरदेवांना ‘मामा’ बनविणारी टोळी, साखरपुड्यानंतर होते भावी वधू गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 05:54 AM2018-12-27T05:54:07+5:302018-12-27T05:54:26+5:30
विवाह इच्छुक तरुणाच्या कुटुंबीयांना ‘मामा’ बनविणारी टोळी उघड झाली आहे. बोगस वधू, तिचे आई, वडील, मामा व नातलगांची नाटकी फौज नवरदेवाच्या कुटुंबीयांना आर्थिक गंडा घालत आहेत.
- सचिन लाड
सांगली : विवाह इच्छुक तरुणाच्या कुटुंबीयांना ‘मामा’ बनविणारी टोळी उघड झाली आहे. बोगस वधू, तिचे आई, वडील, मामा व नातलगांची नाटकी फौज नवरदेवाच्या कुटुंबीयांना आर्थिक गंडा घालत आहेत.
ही टोळी बाहेरील जिल्ह्यातील नवरदेवाचा शोध घेऊन त्याला गाठतात. मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम नवरदेवाच्या घरात केला जातो. साखरपुडाही करण्यात येतो. साखरपुड्यावेळी एजंट नवरदेव कुटुंबाकडून घसघशीत कमिशन घेतात. मात्र, त्यानंतर ते गायब होतात.
विवाहासाठी मुलींना विकण्याचा कर्नाटकातील काही गावांत व्यवसायच सुरू झाला आहे. ‘एका दिवसात विवाह जमवून देतो,’ अशी जाहिरातबाजी त्यांच्याकडून केली जात आहे. जाहिरात वाचून सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर भागातील नवरदेव कुटुंबीय या दलालांच्या संपर्कात येतात. मुलाचे लग्न होण्यासाठी ते वाट्टेल तेवढे पैसे मोजतात. नियोजित वधू व नवरदेव यांना एकमेकांना पाहण्याची बैठकही कर्नाटकातच घेतली जाते. मुलगी पसंत असल्याचा निरोप दिला की, दलालांकडून प्रथम पैशांची बोलणी सुरू होते. चार ते पाच लाखापर्यंत सौदा होतो. त्यामध्ये दलाल व वधूचे बोगस कुटुंबीय पैसे वाटून घेतात. लग्नाचा खर्चही नवरदेवाच्याच गळ्यात मारला जातो.
फसवणूक झाली असेल, तर संबंधितांनी पोलिसांत तक्रार करावी. तक्रार दाखल झाल्यास अशा प्रकरणांचा छडा निश्चितपणे लावला जाईल. कोणताही अन्याय झाला, तर लोकांनी न घाबरता तक्रार दिलीच पाहिजे.
- शशिकांत बोराटे, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख, सांगली.