मुख्यमंत्रिपदासाठी शिवसैनिकांची लोटांगण यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 12:46 PM2019-11-03T12:46:51+5:302019-11-03T12:52:40+5:30
आदित्य ठाकरे हेच या पदासाठी सर्वाधिक दावेदार असून त्यांना अभ्यासू व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून संधी मिळावी.
सांगली: युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून सांगलीतील शिवसैनिकांनी रविवारी लोटांगण यात्रा काढून गणरायाला साकडे घातले.
सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांपासून सकाळी ११ वाजता ही यात्रा काढण्यात आली. शिवसेनेचे हरीदास पडळकर यांनी शिवरायांना अभिवादन करीत लोटांगण घालण्यास सुरुवात केली. मारुती रोड, हरभट रोड, बालाजी चौक, कापड पेठ, सराफ कट्टा, गणपती पेठ ते गणपती मंदिरापर्यंत ही यात्रा काढण्यात आली. यावेळी पडळकर म्हणाले की, युतीचे सरकार असूनही गेल्या पाच वर्षात शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालेले नाही.
सामान्य माणसांच्या प्रश्नांवर सतत आक्रमकपणे भांडणाऱ्या शिवसेनेला जनतेच्या भल्यासाठी मुख्यमंत्रिपद हवे आहे. विधानसभेवर भगवा भडकवून राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा शिवसेनेच्या आमदाराला मिळावी. आदित्य ठाकरे हेच या पदासाठी सर्वाधिक दावेदार असून त्यांना अभ्यासू व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून संधी मिळावी. शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा, ही जनतेचीसुद्धा मागणी आहे. त्यामुळे आम्ही जनतेची मागणी घेऊन शिवरायांना व गणरायाला साकडे घालण्यासाठी ही यात्रा काढली होती. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार याची मला खात्री आहे. यात्रेत शहरप्रमुख हरीभाऊ लेंगरे, प्रदीप शिंदे, सचिन वाघमोडे, प्रमोद सूर्यवंशी, विनायक येडके, अनिकेत खांडेकर आदी सहभागी झाले होते.
तुळजाभवानीलाही साकडे
पडळकर म्हणाले की, दरवर्षी आम्ही तुळजापूरला दुचाकी यात्रा काढीत असतो. तुळजाभवानी मातेलाही आम्ही राज्यात विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी प्रार्थना केली होती. आता यासंदर्भात तुळजाभवानी मातेकडेसाकडे घालणार आहोत.