पालिकेतील गटबाजी प्रदेश काँग्रेसच्या दारी

By admin | Published: June 23, 2016 12:20 AM2016-06-23T00:20:13+5:302016-06-23T01:18:20+5:30

विशाल पाटील गटाविरोधात तक्रार : प्रदेशाध्यक्षांकडून दखल

The party's anti-stalwart Congress Congress | पालिकेतील गटबाजी प्रदेश काँग्रेसच्या दारी

पालिकेतील गटबाजी प्रदेश काँग्रेसच्या दारी

Next

सांगली : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसमधील दिवंगत मदनभाऊ पाटील गट व विशाल पाटील गटातील संघर्ष तीव्र झाला आहे. प्रत्येक निवडीत विशाल पाटील गटाकडून बंडखोरी केली जात आहे. याबाबत बुधवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली. महापालिका व मिरज तालुक्यातील विशाल पाटील यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे मदनभाऊ गटात अस्वस्थता आहे. त्याची चव्हाण यांनी दखल घेतली असून, प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल, अशी ग्वाहीही दिली आहे.
महापालिका व तत्कालीन नगरपालिकेत काँग्रेसचे नेते, माजी मंत्री मदन पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. अपवाद केवळ विकास महाआघाडीच्या पाच वर्षाचा कालावधीचा. महापालिकेसोबतच मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागातही मदन पाटील यांचाच गट कार्यरत आहे. त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. अडीच वर्षापूर्वी महापालिकेच्या निवडणुका मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवून काँग्रेसने पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळविले होते. त्याशिवाय मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही काँग्रेसला यश मिळवून देण्यात मदनभाऊंचा वाटा होता.
गेल्यावर्षी मदनभाऊंचे आकस्मिक निधन झाल्यानंतर वसंतदादा घराण्यातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येऊ लागला आहे. मदनभाऊ गटाचे नेतृत्व त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्याकडे आहे, तर चुलत बंधू विशाल पाटील यांनी महापालिका व मिरज तालुक्यात वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यातूनच महापालिकेतील काँग्रेसमध्ये उघड उघड गटबाजी सुरू झाली आहे. मदनभाऊंच्या पश्चात विशाल पाटील यांनी पालिकेत नगरसेवकांची मोट बांधली आहे. पालिकेतील विरोधक म्हणून नवी ओळख निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. नुकतेच मागासवर्गीय समिती सभापती निवडीत या गटाने बंडखोरी केली होती.
या पार्श्वभूमीवर बुधवारी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष पाटील, माजी सभापती राजेश नाईक उपस्थित होते. महापालिकेतील गटबाजीबाबत चव्हाण यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्यात आले आहे. मदनभाऊ गटाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची तक्रार केली आहे. त्याशिवाय आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात आपणच उमेदवारीचे वाटप करणार असल्याचे विशाल पाटील गटाकडून सांगितले जात आहे. परिणामी मदनभाऊ गटात अस्वस्थता असल्याचे चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे समजते.
अशोक चव्हाण यांनी मदनभाऊ गटाला दिलासा देताना, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कुणाच्या सांगण्यावरून उमेदवारी दिली जाणार नाही. काँग्रेसच्या प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाहीही दिल्याचे समजते. (प्रतिनिधी)

अशोक चव्हाण : आॅगस्टमध्ये येणार
काँग्रेसमधील गटबाजीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण हे आॅगस्ट महिन्यात सांगलीच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी काँग्रेसचा मेळावाही आयोजित केला जाणार आहे. महापालिकेचे महापौर हारुण शिकलगार व काही नगरसेवकही लवकरच चव्हाण यांच्या भेटीसाठी मुंबईला जाणार आहेत. महापालिकेतील अडचणीसोबतच गटबाजीबाबत ठोस भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही या भेटीत केली करणार असल्याचे सांगितले.

Web Title: The party's anti-stalwart Congress Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.