कोरोना चाचणी निगेटिव्ह असेल तरच विक्रेत्यांना पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:27 AM2021-04-21T04:27:46+5:302021-04-21T04:27:46+5:30
सांगली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घरपोच सेवा देणाऱ्या विक्रेते, व्यावसायिकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह ...
सांगली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घरपोच सेवा देणाऱ्या विक्रेते, व्यावसायिकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह असेल तर अशा विक्रेत्यांना महापालिकेकडून ओळखपत्र दिले जाईल, असे आयुक्त नितीन कापडणीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
कापडणीस म्हणाले की, राज्य शासनाने कोरोनाबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. त्याची बुधवारपासून अंमलबजावणी सुरू होईल. शहरातील सर्वच आस्थापना सकाळी ७ ते ११ यावेळेतच सुरू राहतील. सायंकाळपर्यंत घरपोच सेवा देण्याची मुभा आहे. पण ही सेवा देणारे ४५ वर्षांवरील व्यावसायिक अथवा विक्रेत्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. त्याचा अहवाल निगेटिव्ह असेल तर त्यांना महापालिकेकडून पासेस दिले जातील. तसेच त्यांनी लसीकरणही झालेले असावे, असे कापडणीस यांनी सांगितले.
कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी विशेष पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. सकाळी अकरानंतर दुकाने सुरू झाल्यास पहिल्यांदा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यानंतर पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्यास संचारबंदी संपेपर्यंत दुकाने सील केली जातील, असे उपायुक्त राहुल रोकडे यांनी सांगितले.