पाषाणातून प्राचीन इतिहासाचा पाझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:19 AM2020-12-27T04:19:14+5:302020-12-27T04:19:14+5:30
अविनाश कोळी/सांगली पाषाणाला पाझर फुटला की समृद्धीचा प्रवाह सुरू होतो. अशाच पाषाणांमधून इतिहासात लपलेल्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक समृद्धीचा पाझर ...
अविनाश कोळी/सांगली
पाषाणाला पाझर फुटला की समृद्धीचा प्रवाह सुरू होतो. अशाच पाषाणांमधून इतिहासात लपलेल्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक समृद्धीचा पाझर गेल्या काही वर्षांत मिरजेतील संशोधकांच्या अथक प्रयत्नातून फुटला. जमिनीच्या उदरातून इतिहासाचा खजाना बाहेर पडताना हजारो वर्षांपूर्वीच्या प्रथा, अर्थकारण, राजवटी, शिस्त, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक धोरणे यांचा उलगडा झाला. आता हा खजाना भविष्यातही जतन करून ठेवण्याचे आव्हान आहे. एकीकडे पाषाणातून इतिहासाचा खजाना उलगडत असताना, शासन पाषाण बनून याकडे दुर्लक्ष करीत आहे.
वर्तमान आणि भविष्याची वाटचाल करताना इतिहासातील अनुभवही तितकेच महत्त्वाचे ठरत असतात. म्हणूनच संशोधनाची ही बिकट वाट व्रतस्थ असलेल्या संशोधकांनी निवडली. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत २० शिलालेखांचा शोध लागला आहे. त्यामध्ये वीरगळ, सती शिळेचा लेख, दानलेख, मूर्ती लेख, गद्देगाळ अशा शिलालेखांचा समावेश आहे. ऐतिहासिक पुराव्यासाठी शिलालेख हे सर्वात विश्वसनीय प्रमाण मानले जाते. अशा विश्वसनीय लेखांचे जतन सांगली जिल्ह्यात होत आहे. १० व्या ते १३ व्या शतकातील प्राचीन शिलालेख शोधले गेले. चालुक्य, कलचुरी, शिलाहार, यादव राजवटींमधील संस्कृतीवर प्रकाशझोत टाकण्यात आला.
हजारो वर्षांपूर्वी कोणते चलन वापरले जात होते, त्यावेळचे अर्थकारण कसे होते, दळणवळण कसे चालायचे, दानधर्म, धार्मिक कार्यक्रमांचे स्थान काय होते, प्रथा, परंपरा कशा होत्या, योद्धे, राजा कोण होता, त्याची राजवट किती काळ राहिली, त्याला मरण कसे आले, अशा एक ना अनेक गोष्टी समाेर आल्या. हजारो वर्षांपूर्वी व्यापाऱ्यांची संघटना अस्तित्वात होती. त्यांच्याकडून समुद्रमार्गे मालाची निर्यात केली जायची. इतकेच नव्हे, तर आताच्या व्यावसायिक, सामाजिक जबाबदारी (सीएसआर) प्रमाणे प्राचीन काळातही व्यापारी सामाजिक उत्तरदायित्व जपत असत, याचे पुरावेसुद्धा या पाषाणांनी दिले. वीरगळावरील महाराष्ट्रातील सर्वात जुना म्हणजे ९५० वर्षांपूर्वीचा लेख कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगावात सापडला.
अशा अनेक कहाण्या इतिहासाच्या पोतडीतून बाहेर येत असताना, शासन मात्र गांधारीच्या भूमिकेत आहे. अनेक देशांमध्ये छाेट्या संशोधनांची दखल शासनाकडून तत्परतेने घेतली जाते. महाराष्ट्रात आणि देशातही कोणत्याच यंत्रणेकडून ऐतिहासिक संशोधनाची दखल घेतली जात नाही. जिल्ह्यांच्या, राज्यांच्या गॅझेटियरमध्ये याच्या नोंदी घ्याव्यात, संशोधकांना प्रोत्साहन द्यावे, संशोधनाबद्दलची माहिती घ्यावी, अशा कोणत्याही गोष्टी कराव्याशा वाटत नाहीत. शासनाचा पुरातत्व विभाग इतिहासाचा व आपला काही संबंध नसल्याच्या भूमिकेत असलेल्या पुरातत्व विभागाला जाग आली, तर या पाषाणांना देवपण येईल.