नीरा-लोणंद दुहेरीकरणासाठी ९ दिवस पॅसेंजर गाड्या रद्द, पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील प्रवाशांची होणार गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 12:48 PM2023-10-14T12:48:34+5:302023-10-14T12:48:57+5:30
मिरज : नीरा-लोणंद स्थानकादरम्यान ब्लॉक घेऊन रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. यासाठी दि. १२ ते २१ ...
मिरज : नीरा-लोणंद स्थानकादरम्यान ब्लॉक घेऊन रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. यासाठी दि. १२ ते २१ ऑक्टोबरदरम्यान काही रेल्वे गाड्या रद्द, काही गाड्यांचे मार्ग अंशतः रद्द व काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. नवरात्र व दसऱ्याच्या काळात रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
पुणे विभागात पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील नीरा-लोणंद स्थानकादरम्यान ब्लॉक घेऊन रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी विविध तांत्रिक कामांसाठी दि. १२ ते २१ दरम्यान काही पॅसेंजर व डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-फलटण, लोणंद-फलटण व पुणे-सातारा या डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दि.२१ व २२ ऑक्टोबर रोजी सुटणारी पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस कोल्हापूर ते सातारापर्यंतच धावेल. त्यामुळे ही गाडी पुणे-सातारा-पुणे अशी रद्द राहील.
दि. २२ रोजी सुटणारी मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून नियमित वेळेऐवजी दोन तास उशिरा म्हणजेच सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी सुटेल. तर कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून नियमित प्रस्थानाऐवजी अडीच तास उशिरा म्हणजे सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी सुटेल.
ब्लॉकमुळे १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान सुटणारी कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेसही विलंबाने धावेल. दि.२१ ऑक्टोबर रोजी चंदीगडहून सुटणारी चंदीगड यशवंतपूर एक्स्प्रेस पुणे ते सातारादरम्यान विलंबाने धावणार आहे.