सांगलीत एका प्रवाशाचे अपहरण करून खून, तिघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 10:29 PM2017-11-24T22:29:18+5:302017-11-24T22:29:35+5:30

रिक्षाचालक पिता-पुत्रासह तिघांनी गजानन किसन सूर्यवंशी (वय ४५, रा. अहिल्यानगर, कुपवाड) या प्रवाशाला लुबाडण्यासाठी त्याचे अपहरण करुन नंतर निर्घृण खून केला. लूटमारीच्या दुस-या एका गुन्ह्यात या तिघांना अटक केल्यानंतर शुक्रवारी पहाटे खुनाची ही घटना उघडकीस आली.

A passenger was abducted in Sangli, three people were arrested for murder and three arrested | सांगलीत एका प्रवाशाचे अपहरण करून खून, तिघांना अटक 

सांगलीत एका प्रवाशाचे अपहरण करून खून, तिघांना अटक 

Next

सांगली : रिक्षाचालक पिता-पुत्रासह तिघांनी गजानन किसन सूर्यवंशी (वय ४५, रा. अहिल्यानगर, कुपवाड) या प्रवाशाला लुबाडण्यासाठी त्याचे अपहरण करुन नंतर निर्घृण खून केला. लूटमारीच्या दुस-या एका गुन्ह्यात या तिघांना अटक केल्यानंतर शुक्रवारी पहाटे खुनाची ही घटना उघडकीस आली. सांगलीवाडीतील कदमवाडी येथे उसाच्या शेतात सूर्यवंशी यांचा मृतदेह आढळून आला. रात्री उशिरा मृतदेहाची ओळख पटविण्यात शहर पोलिसांना यश आले.
नितीन सुभाष जाधव (वय ४२), त्याचा अल्पवयीन मुलगा व अमृत संभाजी पाटील (२१, तिघे रा. कलानगर, सांगली) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 
गजानन सूर्यवंशी हे तानाजी चौकातील ‘जय दीपक’ हॉटेलमध्ये कामाला होते. २२ नोव्हेंबरला ते रात्री नऊ वाजता हॉटेलमधून घरी जाण्यास निघाले होते. वखारभागमार्गे ते कॉलेज कॉर्नरकडे जात होते. बँक आॅफ बडोदाजवळ ते गेले असता, पाठीमागून रिक्षातून (क्र. एमएच १० डब्ल्यू ६४१) नितीन जाधवसह तिघे आले. त्यांनी सूर्यवंशी यांना, अहिल्यानगर येथे सोडतो, असे म्हणून रिक्षात घेतले. नंतर रिक्षातच त्यांना बेदम मारहाण केली. सूर्यवंशी यांनी, पोलिसांत तक्रार करतो, अशी धमकी दिली. त्यामुळे तिघांनी त्यांना बायपासमार्गे सांगलीवाडीतील कदमवाडीत शेतात नेले. तेथे त्यांच्यावर कु-हाडीने हल्ला केला. गळ्यावर वार बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह उसाच्या शेतात फेकून तिघेही घरी गेले. अंघोळ करुन ते रिक्षाने पुन्हा सांगलीत तरुण भारत क्रीडांगणावजवळील बस थांब्यावर आले.
तेथे बुधगाव (ता. मिरज) येथील रामदास घोडके बसच्या प्रतीक्षेत थांबले होते. या तिघांनी त्यांनाही, बुधगावला सोडतो, असे म्हणून रिक्षात घेतले व बायपास रस्त्यावरुन त्यांनी न्यू प्राईड सिनेमागृहाकडे रिक्षा वळविली. सिनेमागृहाजवळ रस्त्याकडेला अंधारात त्यांनी रिक्षा थांबविली व घोडके यांच्या हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या, आठ हजाराची रोकड व मोबाईल काढून घेतला.. या घटनेनंतर घोडके यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी पोलिसांना संशयितांचे वर्णन व रिक्षाचा क्रमांक सांगितला. पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करुन शोध सुरु केला. पण संशयितांचा सुगावा लागला नाही. रिक्षा क्रमांकावरुन नितीन जाधव याचा शोध लागला. मात्र तो सापडला नाही. त्याच्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. 

बढाई मारायला गेला आणि अडकला...
नितीन जाधवच्या मुलास गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. तो नशेत होता. पोलिसांनी त्याला रामदास घोडके यांना लुटल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. तोपर्यंत पोलिसांना गजानन सूर्यवंशी यांच्या खुनाबद्दल काहीच माहीत नव्हते. पोलिसांनी चौकशीचा ससेमिरा लावल्यानंतर जाधवच्या मुलाने ‘हे काहीच नाही, यापेक्षाही मोठे काम केले आहे’, असे सांगितले. पोलिसांनी काय काम केले आहेस, अशी विचारणा केली. यावर त्याने, मला काय विचारताय, अमृत पाटीलला विचारा, असे सांगितले. त्यानंतर अमृतलाही ताब्यात घेतले. रामदास घोडके यांना लुटण्यापूर्वी गजानन सूर्यवंशी यांचे अपहरण करुन त्यांचा खून केल्याची त्याने कबुली दिली. त्यानंतर मग नितीन जाधव यालाही अटक केली. तिघांनी शुक्रवारी पहाटे सूर्यवंशी यांना मारलेले ठिकाण दाखविले. तिथे त्यांचा मृतदेहही सापडला. 

जामिनावर सुटताच दुसरा खून
नितीन जाधव पिता-पुत्रांनी सहा महिन्यापूर्वी पंचशीलनगरमधील शशिकांत पाटील यांचाही अशाचप्रकारे खून केला होता. बायपास रस्त्यावरुन चालत जाणाºया पाटील यांना त्यांनी पंचशीलनगरला सोडतो, असे म्हणून रिक्षात घेतले. पण तेथून रिक्षा त्यांनी बायपास पुलावर घेतली. तिथे पाटील यांचा खून करुन मृतदेह नदीत फेकून दिला होता. त्यावेळी जाधव पिता-पुत्रासह तिघांना अटक केली होती. पण ते जामिनावर बाहेर आले. त्यांना जामीन मंजूर झाला नसता, तर सूर्यवंशी यांचा खून झाला नसता.

Web Title: A passenger was abducted in Sangli, three people were arrested for murder and three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून