खासगी शिवशाही चालकांच्या दादागिरीमुळे प्रवासी त्रस्त, रात्री प्रवाशांची ससेहोलपट
By संतोष भिसे | Published: September 26, 2022 07:01 PM2022-09-26T19:01:26+5:302022-09-26T19:02:07+5:30
शहरातील प्रवासात छोटे थांबे घेत नसल्याने प्रवाशांना भुर्दंड
सांगली : खासगी शिवशाही गाड्यांवरील चालकांच्या दादागिरीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासातील तसेच शहरातील प्रवासात छोटे थांबे घेत नसल्याने प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागत आहे.
एसटी महामंडळाकडे खासगी कंपनीच्या शिवशाही गाड्या मोठ्या संख्येने आहेत. त्यामध्ये वाहत नियुक्त नसतो. त्यामुळे चालक मनमानीपणे सेवा देत असल्याने उत्पन्न बरेच घटले होते. थांब्यावर प्रवाशांनी हात केल्यानंतरही गाडी न थांबविणे, रिकामीच पळविणे असे प्रकार सुरु होते. याला आळा घालण्यासाठी व उत्पन्न वाढविण्यासाठी महामंडळाने काही महिन्यांपूर्वी आपले वाहक नियुक्त केले. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली. गाड्या भरुन धावू लागल्या. पण त्यानंतरही चालकांची दादागिरी थांबली नाही.
पुण्या-मुंबईहून आलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या सामान्यत: शहरातील छोट्या थांब्यांवर प्रवासी उतरण्यासाठी थांबतात. सांगलीत शासकीय रुग्णालय, पुष्पराज चौक, बाजार समिती, विश्रामबाग, विजयनगर, वॉन्लेसवाडी, मिरजेत वंटमुरे कॉर्नर, रेल्वेस्थानक असे थांबे घेत जातात. एसटीच्या सर्व बसेस व शिवशाही गाड्या तेथे थांबतात. खासगी शिवशाहीचे चालक मात्र थांबत नाहीत. सांगली बसस्थानकानंतर थेट विश्रामबाग आणि मिरज बसस्थानकांत थांबतात. त्यामुळे अध्येमध्ये उतरु इच्छिणाऱ्या प्रवाशांचे हाल होतात.
विशेषत: रात्री उशिरा शहरात आलेल्या प्रवाशांना रिक्षासाठी जादा पैसे मोजावे लागतात. या छोट्या थांब्यांवर थांबण्यासाठी वाहकाने सूचना करुनही दुर्लक्ष केले जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात चालकांना सक्त सूचना देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
खासगी लक्झरी थांबतात, मग शिवशाही का नाही?
खासगी प्रवासी कंपन्यांच्या गाड्या सर्व थांब्यांवर थांबतात, एकेक प्रवासी घेतात किंवा उतरवतात. मग शिवशाही का थांबत नाही? असा प्रवाशांचा प्रश्न आहे. एसटीच्या उत्पन्नाशी काहीही देणेघेणे नसलेल्या खासगी चालकांमुळे महामंडळाची प्रतिमा मलीन होत आहे.