धावत्या रेल्वेतून रात्री प्रवाशांनी अचानक मारल्या उड्या ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 09:05 PM2019-07-04T21:05:51+5:302019-07-04T21:08:13+5:30
मिरज रेल्वे स्थानकात बुधवारी रात्री परळी पॅसेंजरचा प्लॅटफॉर्म अचानक बदलल्याने, परळीला जाणारे प्रवासी कोल्हापूर-सांगली पॅसेंजरमध्ये बसले. पॅसेंजर सुटल्यानंतर ही बाब लक्षात आल्यानंतर काही प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून उड्या टाकल्याने स्थानकात गोंधळ
मिरज : मिरज रेल्वे स्थानकात बुधवारी रात्री परळी पॅसेंजरचा प्लॅटफॉर्म अचानक बदलल्याने, परळीला जाणारे प्रवासी कोल्हापूर-सांगली पॅसेंजरमध्ये बसले. पॅसेंजर सुटल्यानंतर ही बाब लक्षात आल्यानंतर काही प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून उड्या टाकल्याने स्थानकात गोंधळ उडाला.
मिरज स्थानकातून दररोज रात्री मिरज-परळी व कोल्हापूर-सांगली पॅसेंजर सुटते. दररोज परळी पॅसेंजर प्लॅटफॉर्म तीनवरून व सांगली पॅसेंजर प्लॅटफॉर्म एकवरून रवाना होते.
दोन्ही पॅसेंजरच्या वेळेत दहा ते पंधरा मिनिटांचाच फरक आहे. बुधवारी रात्री प्लॅटफॉर्म एकवर येणारी कोल्हापूर-सांगली पॅसेंजर ऐनवेळी प्लॅटफॉर्म चारवर घेण्यात आली. या बदलाबाबत ध्वनिक्षेपकावरून उद्घोषणा झाली नसल्याने व परळी पॅसेंजर आली नसल्याने परळीला जाणारे प्लॅटफॉर्म तीनवरील प्रवासी सांगली पॅसेंजरमध्ये बसले. पण ही पॅसेंजर सांगलीच्या दिशेने जाऊ लागल्याने आतील प्रवाशांत गोंधळ उडाला.
काही प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून प्लॅटफॉर्मवर उड्या मारल्या. यामुळे साखळी ओढून पॅसेंजर थांबविण्यात आली. पॅसेंजरमधून उड्या मारलेल्या काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. रेल्वेच्या या कारभाराबाबत प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.