रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! धावत्या रेल्वेतच मिळणार कन्फर्म तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 01:39 PM2022-06-13T13:39:37+5:302022-06-13T13:40:08+5:30
अनेकदा तपासणीसाला हाताशी धरून प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. याला यंत्रामुळे आळा बसेल
सांगली : चालत्या रेल्वेत प्रवाशांची तिकीट तपासणी करून प्रसंगी दंडाच्या पावत्या फाडणारे तिकीट तपासणीस सर्वांच्या परिचयाचे आहेत. त्यांच्या हातात आता पावती पुस्तकाऐवजी हॅण्ड हेल्ड टर्मिनल यंत्रे (एचएचटी) येणार आहेत. पुणे विभागात त्यांचे वितरण सुरू झाले आहे. यामुळे प्रवाशांना धावत्या गाडीतच तिकीट मिळणार आहे.
प्रवासादरम्यान विनातिकीट प्रवाशांना तपासणीसाकडून दंडाच्या पावत्या लिहून दिल्या जातात. जनरलचे तिकीट काढून स्लीपर बोगीत बसलेल्यांनाही अतिरिक्त प्रवास शुल्काची पावती द्यावी लागते. यासह अनेकविध कारणांसाठी तपासणीसाला पावत्या फाडाव्या लागतात. हे काम आता एचएचटी यंत्राद्वारे केले जाईल. ही यंत्रे ऑनलाइन प्रणालीद्वारे रेल्वेच्या सर्व्हरला जोडलेली असतील. पैसे दिल्यानंतर यंत्रातून त्याची पावती निघेल. त्याची ऑनलाइन नोंद रेल्वेकडे होईल. सध्या एसटीचे वाहक, पतसंस्थांचे पिग्मी एजंट, रेशनिंग दुकाने अशा ठिकाणी या प्रकारची यंत्रे वापरली जातात.
रेल्वेत कन्फर्म तिकिटासाठीही यंत्राचा वापर होईल. धावत्या रेल्वेत एखादी सीट रिकामी असेल, तर त्याची नोंद यंत्रामध्ये केली जाईल. रेल्वेतच प्रवाशाच्या मागणीनुसार कन्फर्म तिकीट दिले जाईल. अनेकदा तपासणीसाला हाताशी धरून प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. याला यंत्रामुळे आळा बसेल.
पुणे विभागात ९६ यंत्रे आली आहेत. मिरज स्थानकात ५७ यंत्रांची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक तपासणीसांकडे एक यंत्र देण्यात येईल.