पतंगराव-जयंतराव यांच्यात ‘सोनहिरा’वर गुफ्तगू
By admin | Published: May 2, 2016 11:54 PM2016-05-02T23:54:54+5:302016-05-03T00:43:41+5:30
सलोखा कायम : कारखानदारी व जिल्हा परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची शक्यता
कडेगाव : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार जयंत पाटील व राष्ट्रीय काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम या दोन्ही दिग्गज नेत्यांत सोनहिरा साखर कारखाना येथे अध्यक्षांच्या दालनात गुप्त चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना राजकीय सल्ले दिल्याचे समजते. राजकीय व्यासपीठावर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात नेत्यांमध्ये असलेला परंपरागत सलोखा आजही कायम असल्याचे स्पष्ट झाले.
वांगी येथील सोनहिरा कार्यालयात एका विवाह समारंभानिमित्त जयंतराव पाटील आले होते. या विवाहासाठी पतंगराव कदमही उपस्थित होते. विवाह समारंभ आटोपून दोन्ही नेते दुपारी ४ वाजता सोनहिर काखाना येथे आले. यावेळी अध्यक्ष मोहनराव कदम यांच्या दालनात दोन्ही नेत्यांनी एकांतात चर्चा केली.
यावेळी पं. स. सदस्य सखाराम सूर्यवंशी व बाबासाहेब सूर्यवंशी यांनी दोघांचेही स्वागत करून सत्कार केला. यावेळी चिफ केमिस्ट प्रकाश देशमुख, अर्जुन जगदाळे आदी उपस्थित होते.
पाटील यांनी कदम यांच्याकडून सोनहिरा कारखान्याच्या गाळप क्षमता, आसवनी प्रकल्प, सहवीजनिर्मिती प्रकल्प याबाबत माहिती घेतली. पतंगरावांनी एफ.आर.पी.प्रमाणे ऊसदर दिला, १०० कोटीचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. विस्तारीकरणानंतर माझा कारखाना राज्यात सर्वाधिक दर देणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्याच्या राजकारणात अग्रेसर असलेले तसेच नेतृत्वाच्या शर्यतीत एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही नेत्यांत आगामी राजकीय वाटचालीबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. यावेळी पाटील भाजपशी सलोखा करून रस्ता चुकू नयेत म्हणून पतंगरावांनी काही टिप्स दिल्याचेही समजते. आगामी जिल्हा परिषद तसेच अन्य निवडणुकांबाबत दोघात चर्चा झाली असल्याची शक्यता कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत होती. परंतु याबाबतचा अधिकृत तपशील समजू शकला नाही. (वार्ताहर)
दोघांनी एकसंध व्हावे : कार्यकर्त्यांची इच्छा
प्रारंभी जयंतराव व पतंगराव या दोन्ही नेत्यांचा सभागृहामध्ये सत्कार केला. यावेळी पं. स. सदस्य सखाराम सूर्यवंशी यांनी, भीषण दुष्काळाने महाराष्ट्र होरपळत आहे. पतंगराव कदम यांनी पाणी आणले, म्हणून आम्ही सुखी आहे. आता तुम्ही दोघांनी एकसंध होऊन पुन्हा महाराष्ट्र उभा करा, असे सांगितले. यावर जयंतराव पाटील यांनी एकविचाराने वाटचालीचे संकेत दिले.
वांगी (ता. कडेगाव) येथे सोनहिरा कारखाना येथे अध्यक्षांच्या दालनात माजीमंत्री डॉ. पतंगराव कदम, आ. जयंत पाटील यांची गुप्त चर्चा झाली.