पतंगराव-जयश्रीतार्इंची रविवारी चर्चा--इच्छुकांकडून दोन्ही नेत्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 11:21 PM2017-08-25T23:21:26+5:302017-08-25T23:23:45+5:30
सांगली : महापालिकेच्या आठ स्थायी समिती सदस्यांची सोमवारी विशेष महासभेत निवड होणार आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम व महापालिकेच्या नेत्या जयश्रीताई मदन पाटील यांच्यात रविवारी चर्चा होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या आठ स्थायी समिती सदस्यांची सोमवारी विशेष महासभेत निवड होणार आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम व महापालिकेच्या नेत्या जयश्रीताई मदन पाटील यांच्यात रविवारी चर्चा होणार आहे. दरम्यान, स्थायी समितीसाठी काँग्रेसमधील इच्छुकांची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे नेतेमंडळी कोणाला संधी देतात, याकडे साºयांचेच लक्ष लागले आहे.
स्थायी समितीचे आठ सदस्य ३१ आॅगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. नव्या सदस्यांच्या निवडीसाठी निवृत्तीपूर्वीच विशेष सभा घेण्यात येत आहे. ही सभा सोमवारी, २८ रोजी होत आहे. निवृत्त होणाºया सदस्यांत काँग्रेसचे सहा, तर राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. दोन्ही पक्षांच्या गटनेत्यांकडून आठ सदस्यांची नावे महापौरांकडे देण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी आपापल्या गटनेत्यांकडे स्थायी समितीत संधी देण्यासाठी साकडे घातले आहे.
काँग्रेसचे नेते पतंगराव कदम, जयश्रीताई पाटील यांचीही काही सदस्यांनी भेट घेतली आहे. स्थायी समिती सभापती निवडीत गतवर्षी काँग्रेसला बहुमत असतानाही धक्का बसला होता. काँग्रेसचीच तीन मते फुटली होती. त्यामुळे यंदा केवळ निष्ठावंतांनाच संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
याबाबत येत्या रविवारी पतंगराव कदम व जयश्रीताई पाटील यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी विश्वजित कदमही उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांबाबत आमदार जयंत पाटील हे निर्णय घेणार आहेत.