पतंगराव कदम बोलले खरे, पण..!
By admin | Published: December 3, 2015 11:22 PM2015-12-03T23:22:31+5:302015-12-03T23:55:09+5:30
भानगडीमुळे महापालिका बदनाम : वर्चस्वाच्या लढाईचा पहिला अंक सुरू; कारभार सुधारण्याचे आव्हान
शीतल पाटील- सांगली --सांगली महापालिका आणि भानगडी यांचे नाते काही औरच आहे. भानगडीशिवाय महापालिकेत चांगले-वाईट घडू शकत नाही. जनतेच्या हितासाठी, विकासासाठी भानगडी केल्या, तर गोष्ट वेगळी. पण ‘बदनाम हुए तो क्या, नाम तो हुआ’ अशीच मानसिकता येथील कारभाऱ्यांची राहिल्याने, दररोज बोंबाबोंब सुरू आहे. आता काँग्रेसचे नेते आमदार पतंगराव कदम यांनी महापालिकेतील भानगडबाजीवर बोट ठेवले आहे. वर्षभरात पालिकेचा कारभार सुधारू, अशी ग्वाहीही दिली आहे. पण त्यांना कितपत यश मिळते, याविषयी सध्या तरी साशंकता आहे. कधी बीओटीची भानगड, तर कधी खुल्या भूखंडाची! एक ना अनेक भानगडी महापालिकेत दररोज सुरू असतात. मग सत्ताधारी कोण आहे, हे त्यासाठी महत्त्वाचे नसते. सत्ता कुणाचीही असली तरी, आजअखेर पालिकेतील भागनडीला लगाम घालता आलेला नाही, हेही तितकेच खरे आहे. महापालिका निवडणुकीनंतर पहिले वर्षभर विरोधकांची उपस्थिती जाणवते. नंतर मात्र सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, हे शोधावे लागते. सेटलमेंटचे राजकारण हा तर नेहमीचाच खेळ बनला आहे. या साऱ्यातून जनतेच्या हाती काय पडले, याचा विचार पालिकेच्या पटलावर कधीच झाला नाही. एकीकडे नागरिक चांगले रस्ते, शुद्ध पाणी, आरोग्याच्या सुविधा या मूलभूत सुविधांसाठी टाहो फोडत असतात, तर दुसरीकडे महापालिकेत निवडून आलेले लोकसेवक मात्र स्वत:ची तुंबडी भरण्यातच मग्न असतात. त्यातही साऱ्यांनाच वाटा मिळतो असे नाही. पालिकेचा गाडा हाकणाऱ्या कारभाऱ्यांच्या हाती सारी सूत्रे असतात. सत्ताधारी काँग्रेस व विरोधी राष्ट्रवादी, स्वाभिमानीत असे दोन- चार कारभारी आहेत. तेच सारे निर्णय घेतात आणि आपल्या सहकाऱ्यांवर लादतात. यातूनच आता सत्ताधारी व विरोधकांत खदखद सुरू झाली आहे.
कारभारी नगरसेवकांविरोधात दबाव गटाच्या नावाखाली नगरसेवक एकवटू लागले आहेत. यात केवळ काँग्रेसचेच नव्हे, तर राष्ट्रवादीचेही नगरसेवक आहेत. कारभाऱ्यांनी केवळ आपल्या प्रभागाचा, स्वत:चा विकास करायचा आणि दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नगरसेवकांना वाऱ्यावर सोडायचे, या प्रकारातून आता वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. त्याला पालिकेतील अर्थकारणाची किनार असली तरी, प्रभागाच्या विकासाचा मुद्दाही नजरेआड करून चालणार नाही.
म्हणून कुपवाड विभागीय कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पतंगराव कदम यांनी नगरसेवकांच्या खऱ्या दुखण्यावरच बोट ठेवले आहे. महापौर विवेक कांबळे, गटनेते किशोर जामदार, सुरेश आवटी यांना कानपिचक्या देताना प्रशासनालाही शेलक्या भाषेत टोचले आहे. मोठमोठे नगरसेवक निधी पळवितात आणि बारक्या नगरसेवकांवर अन्याय होतो, असे जाहीरपणे सांगून कदम यांनी, पालिकेत काय चाललंय याचा एक नमुनाच सांगितला. महापालिकेतील बोंबाबोंब थांबवा, असे सांगताना आयुक्तांच्या कारभाराबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. यातून प्रशासन व कारभारी नगरसेवक काय धडा घेतात, हे भविष्यात कळेलच.
खरी कसोटी : महापौर निवडीवेळी
सध्या महापालिकेत वेगवेगळ्या कारभाऱ्यांच्या नेतृत्वाखाली गटा-तटाचे राजकारण सुरू आहे. नगरसेवकांची विभागणी झाली आहे. त्यात दबाव गटाच्या नावाखाली नगरसेवकांचा एक मोठा गट एकत्र आला आहे. या साऱ्यांना काँग्रेसच्या झेंड्याखाली एकसंधपणे ठेवण्याचे आव्हान आ. पतंगराव कदम, जयश्रीताई मदन पाटील व विश्वजित कदम यांच्यासमोर आहे. फेब्रुवारी महिन्यात महापौर, उपमहापौर निवडी होत आहेत. या निवडीवेळी नेत्यांची कसोटी लागणार आहे. त्यासाठी कदम पिता-पुत्रानी आतापासूनच महापालिकेत लक्ष घालून नगरसेवकांना दुरूस्त करण्याची गरज आहे.
भानगडी रोखणार तरी कोण?
महापालिकेतील भानगडींना केवळ विशिष्ट पदाधिकारी, अधिकारीच कारणीभूत आहेत असे नाही. भानगडीच्या विषयात अर्थपूर्ण तडजोड यशस्वी ठरली, तर सारेच एकमेकाच्या सुरात सूर मिसळतात. तिथे कोणी विरोधक नसतो, कोणी सत्ताधारी नसतो. त्यामुळे नेत्यांनी कितीही घोषणा केल्या तरी, भानगडी रोखणे तसे मुश्किलीचे आहे.