शून्यातून विश्व निर्माण करणारे पतंगराव कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:26 AM2021-01-08T05:26:06+5:302021-01-08T05:26:06+5:30

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आणि घरामध्ये शैक्षणिक वातावरण नसताना शेतकरी कुटुंबातील तरुणाने शैक्षणिक विश्व निर्माण केले. ...

Patangrao Kadam who created the world from scratch | शून्यातून विश्व निर्माण करणारे पतंगराव कदम

शून्यातून विश्व निर्माण करणारे पतंगराव कदम

Next

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आणि घरामध्ये शैक्षणिक वातावरण नसताना शेतकरी कुटुंबातील तरुणाने शैक्षणिक विश्व निर्माण केले. हे विश्व उभा करीत असताना त्यांना अनेक अडथळे पार करावे लागले. अनेक सुख-दुःखांना सामोरे जावे लागले; परंतु ते डगमगले नाहीत. एक धडाकेबाज व्यक्तिमत्त्व मी अनुभवले आहे. १५ वर्षे त्यांच्यासोबत काम केले. सुरुवातीच्या काळामध्ये विलासराव देशमुख, त्यानंतर सुशीलकुमार शिंदे, पुन्हा विलासराव देशमुख, त्यानंतर अशोकराव चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या सर्व मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये मंत्रिमंडळामध्ये काम केले. पतंगराव कदम यांच्याकडे कुठलेही खाते आले तरी अतिशय उत्तम पद्धतीने ते विभाग चालवायचे. अरे तुरे पतंगरावजी बोलायचे ते आपलेपणाचे वाटायचे. मी देखील महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षे झाली काम करतोय. परंतु या राज्याच्या मुख्य सचिवाला देखील अरे तुरे बोलावणारे एकमेव नेते होते ते म्हणजे पतंगरावजी कदम होते. त्यांच्या बोलण्यात ज्येष्ठत्व आणि आपुलकी होती. त्यामुळे कोणालाही वाईट वाटायचे नाही. अशा प्रकारचे एक मोकळे ढाकळे व्यक्तिमत्त्व मी पतंगराव कदम यांच्यात बघितले आहे. सभागृहामध्ये कुठलेही उत्तर देत असताना एक कागदही हातात ठेवायचे नाहीत.

पतंगरावजी कदम यांच्या करकिर्दीमध्ये अनेकदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्या परिस्थितीमध्ये त्यांनी केलेले काम साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्याकाळात त्यांनी घेतलेले निर्णय आजही मार्गदर्शक ठरत आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधल्या नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. पतंगराव कदम यांचे वय जवळपास ७४ वर्षे होते, तरीदेखील तरुण कार्यकर्ते देखील त्यांना तेवढाच जवळचा वाटायचा आणि तरुण कार्यकर्त्यांनाही पतंगराव तेवढेच जवळचे वाटायचे. जनरेशन गॅप हे पतंगरावजींच्या बाबतीमध्ये कधीही होताना आम्हाला पाहायला मिळाली नाही.

मी, जयंत पाटील, आर. आर. पाटील, दिलीप वळसे-पाटील आम्ही सगळेच ९० च्या बॅचचे. पतंगरावजी कदम आम्हाला सीनिअर; परंतु काम करीत असताना कधी चेष्टा मस्करी झाली तरी पतंगरावजी मनामध्ये किंतु ठेवायचे नाहीत. अशा प्रकारचे हे व्यक्तिमत्त्व होते. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष टिकविण्याकरिता, वाढविण्याकरिता पतंगराव कदम यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे हे विसरता येणार नाही. सुरुवातीच्या काळापासून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, प्रणव मुखर्जी, अर्जुन सिंग अशा सगळ्या दिग्गजांशी पतंगराव कदम यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. हे आम्ही जवळून पाहिले आहे.

विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील आणि आता पतंगराव कदम आपल्याला सोडून गेले. ही सगळी दिग्गज माणसे होती. या सर्वांची महाराष्ट्राला गरज होती. ती माणसे आकस्मिकरीत्या सगळ्यांना सोडून गेली. आर. आर. पाटील आणि पतंगराव कदम यांचे बंधुभावाचे नाते मी स्वतः पाहिले आहे. पतंगराव कदम यांच्या शेजारीच मंत्रिमंडळमध्ये बसण्यासाठी मला जागा मिळायची. सभागृहामध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि माझ्यामध्ये पतंगराव कदम असायचे. त्यामुळे नेहमी कुठल्याही विषयावर अतिशय अधिकारवाणीने ते बोलायचे. प्रत्येक विषयामध्ये त्यांचा अभ्यास असायचा, म्हणूनच भारती विद्यापीठाचे जाळे सातासमुद्रापलीकडे पोहोचविण्याचे काम हे पतंगराव कदम यांच्या माध्यमातून झाले आहे. हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही.

भारती विद्यापीठासह त्यांनी खूप चांगल्या सहकारी संस्थाही काढल्या. पलूस आणि कडेगावसह सांगली जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे मोठे संस्थात्मक काम आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरासह आदिवासी भागामध्ये, डोंगरी दुर्गम भागामध्ये देखील त्यांनी भारती विद्यापीठाच्या शाळा सुरू केल्या. शरद पवार यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. रयत शिक्षण संस्थेत आम्ही सगळे एकत्र काम करायचो. अनेकदा काही कटू प्रसंग आला तर तो कटू प्रसंग कशा पद्धतीने हाताळायचा याचे अतिशय व्यवस्थित काम कोण करीत असतील तर ते पतंगराव कदम करायचे. अजित तू राज्याचा उपमुख्यमंत्री आणि मी मुख्यमंत्री झालो तर सरकार जोरात चालेल, असे ते अनेकदा गमतीने मला म्हणायचे.

काँग्रेस पक्षात जेव्हा नेतृत्व बदलाचा विषय यायचा, त्यावेळेस पतंगराव कदम हे नाव खूप वरच्या क्रमांकावर असायचे. चर्चाही खूप व्हायची. इतक्या तोडीचे ते नेतृत्व होते. परंतु शेवटी वरिष्ठ निर्णय घेतील तो मान्य असतो. त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीत पतंगराव कदम यांनी कधी मनामध्ये कटुता ठेवली नाही. जे कुणी प्रमुख असतील, त्यांच्याबरोबर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ते काम करायचे. आता पतंगराव कदम यांनी उभा केलेले ‘विश्व’ पुढे नेण्याकरिता त्यांचे पुत्र राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे मोहनशेठ कदम आणि डॉ. शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व एकोप्याने, नेटाने आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील आणि हीच पतंगराव कदम साहेब यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

- अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र

Web Title: Patangrao Kadam who created the world from scratch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.