पतंगराव कदम यांच्या जयंतीचे आज कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:31 AM2021-01-08T05:31:44+5:302021-01-08T05:31:44+5:30
काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांची आज, शुक्रवारी ७७ वी जयंती आहे. यानिमित्त पुणे, सांगली, कोल्हापूर ...
काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांची आज, शुक्रवारी ७७ वी जयंती आहे. यानिमित्त पुणे, सांगली, कोल्हापूर येथे व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा कारखाना येथील स्मृतिस्थळ फुलांनी सजवण्यात आले आहे. तेथे कदम यांना अभिवादन करण्यासाठी कदम कुटुंबीय आणि राज्यभरातून मंत्री, नेते, कार्यकर्ते येणार आहेत.
जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर नाशिक येथील कीर्तनकार अनिल महाराज तुपे यांचे कीर्तन, भजन होणार आहे. सकाळी साडेआठ ते साडेअकरा या वेळेत पतंगराव कदम यांना अभिवादन करण्यासाठी कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित राहणार आहेत.
भारती विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक संकुलांमध्ये कदम यांच्या जीवनकार्याविषयी विविध व्याख्यात्यांचे व्याख्यान होणार आहे. भारती विद्यापीठाच्या पुणे येथील संकुलाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे ऑनलाईन व्याख्यान
गुरुवारी सायंकाळी झाले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता नवी मुंबई येथील संकुलात पत्रकार प्रसन्न जोशी यांचे व्याख्यान होणार आहे. याचवेळी कोल्हापूर येथील संकुलात ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी साडेतीनला भारती विद्यापीठाच्या धनकवडी व एरंडवणे संकुलाच्यावतीने ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांचे व्याख्यान धनकवडी येथे होणार आहे. याचवेळी सांगली येथील संकुलाच्यावतीने
भारती वैद्यकीय महाविद्यालयात ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांचे व्याख्यान होणार आहे. कडेगाव येथील संकुलाच्यावतीने दुपारी तीनला कन्या महाविद्यालय, कडेगाव येथे ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे यांचे व्याख्यान होणार आहे.