‘सोनहिरा’ला पतंगराव कदम यांचे नाव-शरद कदम : नामविस्तार ठराव मंजुरीसाठी आज सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 07:53 PM2018-07-06T19:53:21+5:302018-07-06T19:54:17+5:30
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास डॉ. पतंगराव कदम यांचे नाव देण्याची मागणी होत होती. त्यामुळे नामविस्ताराचा ठराव मंजुरीसाठी शनिवार दि. ७ रोजी विशेष साधारण सभेचे आयोजन केल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम यांनी दिली.
ते म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम यांनी दुष्काळी भागातील लोकांच्या शेतीला पाणी दिले. या भागाचे नंदनवन व्हावे यासाठी ते सतत कार्यरत होते. सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याने ते सामान्य जनतेच्या हृदयात होते. ताकारी, टेंभू योजना चालू राहण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असत. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा, ऊस तातडीने गाळपास जावा यासाठी वांगी येथे उजाड माळरानावर सोनहिरा साखर कारखान्याची स्थापना त्यांनी केली. त्यामुळे गरीब कुटुंबातील तरुणांच्या हाताला काम मिळाले. उसास योग्य दर मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कारखाना राज्यात अव्वल ठरला.
ते म्हणाले की, या साखर कारखान्यास डॉ. पतंगराव कदम यांचे नाव द्यावे, अशी मागणी लोकांतून मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळे ‘डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि., मोहनराव कदमनगर, वांगी’ असा नामविस्तार करण्याचा व कारखाना कार्यस्थळावर त्यांचे भव्य स्मारक उभारले जाण्याचा, त्याठिकाणी त्यांचा जीवनपट मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचठिकाणी शेतकºयांसाठी अत्याधुनिक असे कृ षी मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
याचा निर्णय घेण्यासाठी शनिवार, दि. ७ रोजी दुपारी २ वाजता विशेष साधारण सभेचे आयोजन केले असून सभेसाठी सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कदम यांनी केले आहे.