पतंगराव कदम यांच्या अस्थींचे औदुंबरला विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:17 AM2018-03-14T00:17:11+5:302018-03-14T00:17:11+5:30
अंकलखोप : माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या अस्थिकलशाचे विसर्जन मंगळवारी औदुंबर
अंकलखोप : माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या अस्थिकलशाचे विसर्जन मंगळवारी औदुंबर (ता. पलूस) येथे करण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्ते, नागरिकांनी त्यांच्या अस्थींचे दर्शन घेतले.
सकाळी सातपासून कार्यकर्त्यांनी कृष्णातीरी गर्दी केली होती. सर्वांनी अस्थिकलशासमोर फुले अर्पण केली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना हुंदका आवरता आला नाही. अनेकांचे डोळे पाणावले होते. गोरगरीब सामान्यांचा पोशिंदा गेल्याची भावना व्यक्त केली जात होती.
मंगळवारी डॉ. कदम यांच्या अस्थिकलशाचे औदुंबर येथे विसर्जन करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण निरोप देण्यासाठी गर्दी झाली होती.डॉ. पतंगराव कदम यांच्या अनेक निवडणुकांचा प्रारंभ औदुंबर येथील देवस्थानाच्या साक्षीने होत असे. त्यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित असत. तशीच गर्दी त्यांच्या अस्थिकलश विसर्जनाला दिसून आली. मात्र, यावेळचा प्रसंग वेदना देणारा असल्याने प्रत्येकाचे मन हेलावून गेले होते.
दर्शनानंतर अस्थिकलश दत्त मंदरासमोरील कृष्णातीरावर नेण्यात आला. त्याठिकाणी औदुंबर येथील ब्रम्हवृंदांकडून मंत्रोच्चार करण्यात आले. त्यानंतर बोटीतून कृष्णा नदीच्या मध्यभागी नेऊन अस्थी डॉ. विश्वजित कदम यांच्याहस्ते विसर्जित करण्यात आल्या.कार्यकर्त्यांनी डॉ. विश्वजित कदम, जितेश कदम, सागर कदम, महेंद्रआप्पा लाड, राजेंद्र जगताप व कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी कोल्हापूरचे खा. धनंजय महाडिक, पुण्याचे नगरसेवक अभय छाजेड, सरपंच अनिल विभुते, उपसरपंच मच्छिंद्र गडदे उपस्थित होते.
गावोगावी अस्थिकलश दर्शनासाठी ठेवणार
कडेगाव : भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांचा अस्थिकलश बुधवार दि. १४ ते १९ मार्च या कालावधित कडेगाव पलूस तालुक्यातील सर्व गावांमध्ये तसेच सांगली शहरासह जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी जाणार आहे. गावा-गावांतील कार्यकर्ते व चाहत्यांना दर्शन घेता यावे यासाठी अस्थिकलश ठेवला जाणार आहे. शनिवार, दि. १७ रोजी कुंभारगाव येथे दुपारी ४ वाजता, कुंडल ४, सावंतपूर, सांडगेवाडी ६.४५, बांबवडे ७.२५, मोराळे ८.२०, आंधळी ९. रविवार, दि. १८ रोजी तुपारी सकाळी ८, दह्यारी ८.४५, घोगाव ९.१५, दुधोंडी ९.५०, पुणदी १०.५०, पुणदीवाडी ११.४०, नागराळे १२.१५, रामानंदनगर ४, बुर्ली ५, आमणापूर ५.४५, विठ्ठलवाडी ६.२५, संतगाव ७, सूर्यगाव ७.३०, नागठाणे ८.१०. सोमवार दि. १९ रोजी धनगाव सकाळी ८, बुरुंगवाडी ८.४५, हजारवाडी ९.२०, भिलवडी स्टेशन ९.४५, खंडोबाचीवाडी १०.३५, माळवाडी ११.१०, वसगडे १२, खटाव १२.४०, ब्रम्हनाळ १.१०, सुखवाडी ४.१५, चोपडेवाडी ४.४५, भिलवडी ५.२०, अंकलखोप ६.२५, पलूस ७.४५.