मोहनरावांपेक्षा पतंगराव परिपक्व नेते

By admin | Published: January 3, 2017 11:42 PM2017-01-03T23:42:54+5:302017-01-03T23:42:54+5:30

जयंत पाटील : मुंबईत गेल्याने काहीजण भांबावलेत; निवडणुकीसाठी राष्ट्रवादी सक्षम

Patangrao mature leader than Mohanrao | मोहनरावांपेक्षा पतंगराव परिपक्व नेते

मोहनरावांपेक्षा पतंगराव परिपक्व नेते

Next

सांगली : काही लोक मुंबईला गेल्यावर भांबावतात. त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी राष्ट्रवादीबद्दल केलेल्या वक्तव्याची दखल घेण्याची आम्हाला गरज वाटत नाही. त्यांच्यापेक्षा आम्हाला पतंगराव कदम परिपक्व नेते वाटतात, असे मत राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
पाटील म्हणाले की, पतंगराव कदम यांना राज्याच्या आणि केंद्रातील राजकारणाचा अधिक अनुभव आहे. त्यामुळे त्यांची परिपक्वता अधिक आहे. काँग्रेसचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नसल्याचे मोहनरावांनी सांगण्याची गरज नाही. राष्ट्रवादी निवडणुका लढविण्यासाठी सक्षम आहे. आम्ही कोणाकडेही असा प्रस्ताव दिलेला नाही. स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. स्थानिक पातळीवर काही पक्ष आणि नेते आम्हाला मदत करण्याच्या भूमिकेत आहेत. त्यांची मदत घेऊ. आर. आर. पाटील यांच्या पश्चात तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी संपल्याचे कोणाला वाटत असेल, तर त्यांनी तो गैरसमज दूर करावा. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आबाप्रेमी कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांचे सर्व गड आम्ही जिंकून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना त्यांची जागा दाखवून देऊ.
सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यावर टीका करताना पाटील म्हणाले की, सत्तेत गेल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख कळत असूनही ते त्याबद्दल बोलत नाहीत. विरोधात असते तर नक्कीच त्यांनी आंदोलन केले असते. राजारामबापूंवर टीका करणाऱ्या सदाभाऊंना सत्तेत गेल्यामुळे कोणत्याही गोष्टीचे भान राहिलेले नाही. वसंतदादा पाटील, राजारामबापू आणि गुलाबराव पाटील या नेत्यांनी जिल्'ासह राज्याच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे. अशा थोर नेत्यांवर टीका करताना खोत यांना स्वत:चा मोठेपणा सिद्ध करायचा आहे. ते या नेत्यांपेक्षा स्वत:ला मोठे समजत आहेत, ही गोष्ट दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
शिवसेनेची नको तेवढी थट्टा
राज्यातील राजकारणात प्रथमच सहपालकमंत्री हे पद अस्तित्वात आले आहे. ही पदे शिवसेनेला दिली जात आहेत. आणखी किती थट्टा होईपर्यंत शिवसेना या गोष्टी सहन करणार आहे, असा उपरोधक सवालही पाटील यांनी केला.
मी सदाभाऊंची शिफारस केली होती!
मंत्रिपदासाठी भाजपच्या नेत्यांकडे शिफारस करण्याबाबत सदाभाऊ खोत यांनी विनंती केली होती. मतदारसंघातील सर्वच लोकांची कामे मी नेहमी करीत असतो. विरोधक असला तरी मी राजकारण आणत नाही. त्यामुळे सदाभाऊंसाठी मी शिफारस केली होती. ते आता माझ्यावर टीका करीत असले तरी, त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. सत्ता आल्यावर कधी भान सोडू नये. जमीन सोडायची असते. जेव्हा सत्ता जाते, तेव्हा अशा लोकांची खूप वाईट परिस्थिती होते, असे जयंत पाटील म्हणाले.
आ. नाईकांवर अन्यायच
जिल्हा परिषदेवर सत्ता आल्यानंतरच शिवाजीराव नाईकांना मंत्रिपद दिले जाईल, असे आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर अन्याय केला आहे. शिवाजीराव नाईक ज्येष्ठ नेते आहेत. जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता येणार नाही, याची मुख्यमंत्र्यांना कल्पना असल्याने, त्यांनी असे खोटे आश्वासन त्यांना दिले आहे, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
दोन नेत्यांमध्ये गोेंधळ
स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात शेतीमालाचे दर पडण्यावरून मतभिन्नता दिसून येत आहे. एकाच पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये मतांचा हा गोंधळ आता लोकांनाही दिसला आहे. शेतकऱ्यांना पैशाची गरज नसते किंवा शेतकऱ्यांवर नोटाबंदीचा कोणताही परिणाम झाला नाही, असे मत या दोन्ही नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मेळाव्यात जाहीरपणे मांडावे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

Web Title: Patangrao mature leader than Mohanrao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.