पतंगराव-संजयकाकांमध्ये जुंपली
By Admin | Published: August 29, 2016 12:23 AM2016-08-29T00:23:08+5:302016-08-29T00:23:08+5:30
एकमेकांवर टीका : सांगलीतील राजकारण तापले
सांगली/तासगाव : मोदींच्या गोमूत्राने पवित्र झालेल्या आमदारांना नाहक महत्त्व मिळते, अशी टीका माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी शनिवारी सांगलीत केली होती. त्याला उत्तर देताना खासदार संजयकाका पाटील यांनी, अशी भाषा पुन्हा वापराल, तर अनीतीने उभारलेले साम्राज्य अडचणीत येईल, असा इशारा रविवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
पतंगराव कदम आणि संजयकाकांमधील राजकीय संघर्ष आजही कायम आहे. त्यामुळेच पतंगरावांच्या टीकेनंतर दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा शाब्दिक युद्ध रंगले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गोमूत्राने पवित्र झालेल्या आमदारांना नाहक महत्त्व प्राप्त होते, नको तेवढी या लोकांना प्रसिद्धी मिळते, अशी टीका कदम यांनी केली होती. या टीकेचा समाचार रविवारी संजयकाका पाटील यांनी घेतला.
ते म्हणाले की, पतंगरावांचे मानसिक संतुलन सध्या बिघडलेले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत वाईट भाषा वापरून केलेली टीका पतंगरावांसारख्या ज्येष्ठ राजकारण्याला शोभत नाही. सत्तेचा वापर करून अडचणीत आणायचेच असते, तर अनीतीने उभारलेले यांचे साम्राज्य कधीच अडचणीत आले असते. त्यामुळे त्यांनी जपून टीका करावी.
पंतप्रधानांनी देशात ‘नीट’ लागू केल्यामुळे, समाजाचे शोषण करून दोनशे ते तीनशे कोटी रुपये काही शिक्षण संस्था मिळवीत होत्या, त्यांना ‘ब्रेक’ लागलेला आहे. कदम यांचे मानसिक संतुलन बिघडण्यास हीच गोष्ट कारणीभूत ठरली आहे. गोमूत्राने पवित्र झालेल्या आमदारांवर त्यांनी टीका केली आहे. मी खासदार असलो आणि प्रत्यक्ष माझ्यावर जरी टीका केली नसली तरी, आमच्या पक्षाच्या आमदारांबद्दल त्यांनी अशी भाषा वापरणे हे निंदनीय आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखे समाजहितासाठी संस्था काढण्याचे काम हे लोक करीत नाहीत. धनवंत बापाच्या मुलांसाठी संस्था उभारून निधी गोळा करण्याचे काम ते करीत आहेत. त्यामुळे यापुढे अशी टीका त्यांनी केली, तर त्यांचे हे साम्राज्य अडचणीत येईल, असा इशारा पाटील यांनी दिला.
पतंगराव कदम आणि संजयकाका पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष जुना आहे. कवठेमहांकाळ येथे यापूर्वी झालेल्या एका सभेतही पतंगरावांनी, गोमूत्राने पवित्र झालेले खासदार, अशी टीका त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या केली होती. त्यावेळीही संजयकाकांनी टीकेला उत्तर दिल्याने राजकीय वातावरण तापले होते. (प्रतिनिधी)